कल्याण : दिपेश म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना गळाला लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात आक्रमक पाउले टाकणाऱ्या भाजपने मंगळवारी खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीयांनाच गळाला लावले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिंदे यांच्या पक्षाचे प्रभावी नेते महेश पाटील यांनाच पक्षात घेत भाजपने कल्याण डोंबिवलीत स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

पाटील यांच्या पाठोपाठ शिंदेसेनेतील कल्याण पुर्वेतील एक बडा नेताही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सुरुवातीच्या काळात एकमेकांचे नेते गळाला लावायचे नाहीत हा अलिखीत नियमही भाजपने यानिमीत्ताने मोडीत काढल्याचे आता चित्र आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यभर पक्षवाढीसाठी दौरे सुरु केल्याचे पहायला मिळाले. भाजप वगळता ज्या पक्षाचे नेते, माजी नगरसेवक गळाला लागतील त्यांना पक्षात घ्यायचे असा एकमेव कार्यक्रम शिंदे यांच्याकडून सुरु होता. उद्धव ठाकरे, काॅग्रेस, शरद पवार यांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना गळाला लावत असताना शिंदे यांनी काही ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. भाजपमधील अस्वस्थ पदाधिकाऱ्यांना मात्र प्रवेश नाही अशीच आतापर्यत शिंदे यांची भूमीका होती.

महापालिका निवडणुका जवळ येऊ लागताच भाजपने मात्र शिंदे यांच्या पक्षाची पंख छाटणी पद्धतशीरपणे सुरु केल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांचे निकटवर्तीय असलेले २७ गाव परिसरातील प्रभावी नगरसेवक महेश पाटील यांना पक्षात घेत मंगळवारी भाजपने शिंदे यांना धक्का दिला. त्यापुर्वी डाॅ.शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखले जाणारे दिपेश म्हात्रे यांनाही भाजपने पक्षात घेत आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केल्याचे पहायला मिळाले.

शिंदेंची नरमाई कुठपर्यंत ?

मागील काही वर्षापासून कल्याण डोंबिवलीवर एकहाती सत्ता गाजविणारे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल, अशी प्रतिक्रिया मध्यंतरी दिली होती. शिंदे एकीकडे नरमाईची भूमीका घेत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर भाजपचाच अशी आक्रमक भूमीका घेतली आहे. कल्याण डोंबिवलीत महायुतीमधील नाराजीचा विचार न करता मंगळवारी शिंदे शिवसेनेतील दोन मोठे मोहरे चव्हाण यांनी गळाला लावले.

महेश पाटील यांच्यासह शिंदे शिवसेनेतील माजी नगरसेविका डाॅ.सुनिता पाटील, सायली विचारे यांनाही भाजपने पक्षात घेतले. महेश पाटील यांच्या प्रवेशामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला डोंबिवली पुर्वेतील आजदे, सागर्ली, कल्याण ग्रामीण भागात मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे महेश अचानक चव्हाण यांच्यासोबत भाजपकडे सरकल्याने कल्याण डोंबिवलीत भाजप शिंदे संघर्षाने टोक गाठल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

शिंदेसेनेची तातडीची बैठक

डोंबिवलीत शिंदे शिवसेनेचे म्होरके भाजपमध्ये प्रवेश करत असताना पक्षात अस्वस्थता वाढली होती. शिंदे शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना तातडीने शाखेत येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. डाॅ.श्रीकांत शिंदे स्वत: या घडामोडींवर लक्ष ठेवून होते.