ठाणे – राज्यातील विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून अतिवृष्टी झालेल्या भागाला आर्थिक मदतीसह विविध अत्यावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजपत्रित अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दीड लाख कार्यरत अधिकाऱ्यांचा सप्टेंबर २०२५ महिन्यातील एक दिवसाचा पगार ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनप्रमुख प्रभावी उपाययोजना आखत असून, त्यांना अधिकाऱ्यांची ठाम साथ राहील, अशी ग्वाही महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे दिली आहे.

यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस वेतन कपातीद्वारे मदत केलेली आहे. यंदाही तीच परंपरा कायम ठेवत केवळ कार्यरत अधिकारीच नव्हे तर अनेक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही आपले एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय महासंघाकडे व्यक्त केला आहे.

महासंघ हा शासनमान्यताप्राप्त ७० खातेनिहाय राजपत्रित अधिकारी संघटनांचा संघ असून, अशा वेतन कपातीसाठी स्वतंत्र संमती घेण्याची गरज नाही. या अनुषंगाने सप्टेंबर २०२५ महिन्याच्या वेतनातील कपात करून ती थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा शासन आदेश सत्वर निर्गमित करण्याची विनंती महासंघाने शासनाला केली आहे. यासंदर्भातील पत्राच्या प्रती मुख्यसचिव व वित्त विभागाचे अपर मुख्यसचिव यांना पाठवण्यात आल्या आहेत.