उल्हासनगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या कार्यक्रमात ज्या उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांना गौरवले होते. त्याच आयुक्तांविरूद्ध आता देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप आमदारानेच दंड थोपटले आहे.
उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांना इशारा दिला आहे. येत्या सात दिवसात शहरातील खड्डे बुजवले नाहीत तर महापालिकेबाहेरच उपोषणाला बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या त्यांच्या इशाऱ्यानंतर शहरातून त्यांना पाठिंबा मिळतो आहे तसेच त्यांच्यावर टीकाही होते आहे.
उल्हासनगर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला असून व्यापारी शहर असलेल्या या शहराला यामुळे मोठा फटका बसतो आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्र व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या शहरात ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्र वाणिज्य विषयक आहे. विविध वस्तूंची निर्मिती करणारे लहान मोठे कारखाने, त्याची विक्री आणि साठवणूक करणारी दुकाने तसेच गोदामे शहरात आहेत. लाखो नागरिकांना रोजगार देणार हे व्यापारी शहर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांसाठी वरदान ठरते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर शहरातल्या रस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासले आहे. शहरातील खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्याचा परिणाम शहरातील व्यापारावरही होतो आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांतही संतापाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात हजारोंच्या संख्येने ग्राहक, व्यापारी येण्याची शक्यता आहे. मात्र येथे होणारी कोंडी, रस्त्यांमुळे रडतखडत करावा लागणारा प्रवास यामुळे ग्राहकही या शहराकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शहरातील खड्डे बुजवण्यासाठी विविध राजकीय पक्ष विविध प्रकारे आंदोलने करत आहेत. मात्र खड्डे बुजताना दिसत नाहीत. पालिकेने मास्टिंगच्या कामासाठी निविदा मागवल्या आणि कामही सुरू केले. मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी पालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याविरूद्ध आवाज उठवू लागले आहेत.
प्रशासकीय कारभारात सुधारणा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांचा गौरव केला होता. १०० दिवसांच्या कार्यक्रमात त्या राज्यात अव्वल ठरल्या होत्या. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी गौरवलेल्या आयुक्तांविरूद्ध खड्डेप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्याच आमदाराला आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आमदारांनी फक्त आंदोलन करू नये तर आयुक्तांविरूद्ध तक्रार करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करावे, असे मिष्किल आवाहन विरोधी पक्षांच्या वतीने केले जाते आहे.
तक्रारींचा पाऊस
गेल्या अनेक दिवसांपासून मी आयुक्तांना शहरातील खड्ड्याप्रश्नी भेटून, फोन करून तक्रारी केल्या आहेत. दररोज शहरातून मोठ्या संख्येने माझ्याकडे तक्रारी येत असतात. खड्ड्यांमुळे झालेला अपघात, जखमी झालेल्यांच्या तक्रारी येतात. मात्र आयुक्त त्यावर गंभीर दिसत नाहीत. येत्या सात दिवसात शहरात खड्डे बुजले नाहीत तर मी पालिकेच्या बाहेर आंदोलन करेल, असा इशारा आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.