ठाणे – आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून पंढरपुरकरिता जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे विभागाकडून ४ जुलै आणि ५ जुलै या दोन दिवशी एकूण १६ गाड्या पंढरपुरसाठी रवाना होणार असून या गाड्या अपुऱ्या पडल्यास आणखी अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाकडून देण्यात आली.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्याकरिता दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाच्या वर्षी ६ जुलै ला आषाढी एकादशी आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना पंढरपुरात जाता यावे यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाकडून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा गाड्या उपलब्ध केल्या आहेत.
ठाणे विभागाच्या आठ आगारातून एकूण १६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ४ जुलै आणि ५ जुलै असे दोन दिवस या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यात, ४ जुलै रोजी ठाणे ०१ आगारातून सकाळी ८ वाजता पंढरपुरसाठी पहिली गाडी रवाना होणार आहे. तर, रात्री ८ वाजता या आगारातून दुसरी गाडी पंढरपुरला जाणार आहे.
अशा प्रकारे ठाणे जिल्ह्याच्या ठाणे ०१, ठाणे ०२ , भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा या आगारातून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या गाड्या अपुऱ्या पडल्यास आणखी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटीच्या ठाणे विभागातडून देण्यात आली.
आरक्षण व्यवस्था अशी असणार
आरक्षण स्थिती दररोज तपासुन पहिली फेरी भरल्यानंतर दुसरी फेरी आरक्षणास उपलब्ध केली जाणार आहे. परतीचे आणि समुह पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर करण्यात आली आहे. तरी, नागरिकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करुन घ्यावे असे आवाहन ठाणे विभागाकडून करण्यात आले आहे.
आगार – मार्ग – फेऱ्या
ठाणे ०१ : बोरिवली – सायन – पंढरपुर ०४
ठाणे ०२ : ठाणे – फलटण – पंढरपुर ०४
भिवंडी : भिवंडी – कल्याण – फलटण – पंढरपुर ०३
शहापुर : शहापुर – ठाणे – फलटण – पंढरपुर ०१
कल्याण : विठ्ठलवाडी – नगर – फलटण – पंढरपुर ०१
मुरबाड : कल्याण – नगर – फलटण – पंढरपुर ०१
विठ्ठलवाडी : विठ्ठलवाडी – नगर – फलटण – पंढरपुर ०१
वाडा : वाडा – ठाणे – पुणे – पंढरपुर ०१
एकूण : १६