Maharashtra Live News Updates, 21 July: नुकतेच पार पडलेले विधानसभेचे पावसाळी अधिवेशन शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कँटीनमध्ये केलेली मारहाण आणि त्यानंतर भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळात झालेल्या हाणामारीमुळे गाजल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, हे अधिवेशन संपताच दोन दिवसांत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

याचबरोबर काल लातूरमध्ये कोकाटे यांच्याविरोधातील निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याचा प्रकार घडला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचे व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा घेऊया.

Live Updates
15:23 (IST) 21 Jul 2025

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी? सूरज चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार गटाचा सवाल

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना माराहण केल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण याचा राजीनामा घेण्याच्या सूचना दिल्या. यावर आता शरद पवार गटाचे विकाल लवांडे यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, “हा निर्णय निश्चितच योग्य आहे. पण याच सूरज चव्हाणांना युवक धोरण समितीवर नियुक्त केलं आहे, त्याबाबत अजूनही मौन का? या समितीतून हकालपट्टी कधी होणार? की या समितीत तो ‘तरुणांना हाणामारी कशी करावी’ हे नवीन धोरण राबवणार आहे?”

ते पुढे म्हणाले की, “मात्र खरी चिंता अजूनही अनुत्तरित आहे. राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गैरजबाबदार वर्तनाबद्दल सरकार काय करणार? राजीनामा कधी घेणार?”

15:13 (IST) 21 Jul 2025

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक; पत्ते खेळत केला निषेध

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कोकाटे यांच्या विरोधात विरोधक चांगले आक्रमक झाले आहे. धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील झाशी राणी चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

15:12 (IST) 21 Jul 2025

जालन्यात राष्ट्रवादीचे (अप) कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न; पेट्रोलची पेटती बाटली कार्यालयावर फेकली

जालना: लातूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्या पार्श्वभूमीवर जालन्यात राष्ट्रवादीचे (अप) कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पेट्रोलची पेटती बाटली कार्यालयावर फेकण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून काही तरुणांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे.

14:15 (IST) 21 Jul 2025

सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी

14:02 (IST) 21 Jul 2025

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांवर अरेरावी केल्याच्या आरोप प्रकरणी कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्यावर पोलिसांवर ओरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांनी तशी फिर्यादच घेतली आहे. हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे.

13:26 (IST) 21 Jul 2025

‘बॉम्ब तयार करताना…’; मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता का? उच्च न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?

Mumbai Local Bomb Blast: यावेळी उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांवर कठोर शब्दांत टीका करत असे निरीक्षण नोंदवले की, त्यांना खटल्यातील मुख्य मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात अपयश आले आहे. …अधिक वाचा
13:23 (IST) 21 Jul 2025

मुंबई लोकल बॉम्बस्फोटांवील निकालानंतर सीएसटीवरील सुरक्षा वाढवली

२००६ च्या रेल्वे बॉम्बस्फोटांवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारी स्टेशन प्लॅटफॉर्मवर तपासणीचे ड्रील्स घेत आहेत.

12:38 (IST) 21 Jul 2025

नाशिकमध्ये छावा संघटनेचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आंदोलन

लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीविरोधात, नाशिकच्या राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच त्यांचे बॅनर छावाच्या पदाधिकाऱ्यांनी पायदळी तुडवले. यावेळी चव्हाण यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

12:16 (IST) 21 Jul 2025

अजित पवार गटावर शेतकरी विरोधी ठपका

लातूर येथे ‘छावा’च्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादीने मारहाण केल्यानंतर कृषी मंत्री आणि अजित पवार यांचा गट शेतकरी विरोधी असल्याचा सूर उंचावला जाऊ लागला आहे. …सविस्तर बातमी
12:00 (IST) 21 Jul 2025

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर छावा संघटनेने फाडले; लातूरमधील घटनेचे नांदेडमध्ये पडसाद

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर पत्ते फेकले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.

आता या प्रकरणी छावा संघटनाही आक्रमक झाली असून, त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले नांदेड शहरातील बॅनर फाडले. याचबरोबर अजित पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत, सूरज चव्हाण यांना इशारा दिला.

11:16 (IST) 21 Jul 2025

“सत्तेचा इतका माज बरा नव्हे”; छावा संघटना मारहाण प्रकरण, शरद पवार गटाची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांनी काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “सुनिल तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिडले. प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत, नाहीतर ‘आम्ही फोडून काढू’ असा संदेश हा सत्ताधारी वर्ग देत आहे. त्यांना इतकंच सांगणे आहे की, सत्तेचा इतका माज बरा नव्हे..!”

11:07 (IST) 21 Jul 2025

“जागा तुझी, पण उत्तर आमचंच असेल!”, जलील यांची शिवसेना आमदारावर टीका

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे (एकानाथ शिंदे) बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मी बुलढाण्याच्या मातीत उभा राहून सर्वांच्या आशीर्वादाने हे सांगतो, सरकारमधील कोणताही नेता आमचं काहीही वाकडं करू शकत नाही. जर तुमच्या मनात जराही विचार असेल की, इम्तियाज जलीलवर हात उचलता येईल, तर लक्षात ठेवा, उत्तर दिलं जाईल. जागा तुझी, दिवस तुझा, वेळही तुझी, तरीसुद्धा उत्तर आमचंच असेल!”

10:49 (IST) 21 Jul 2025

उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याने धक्का बसला: सोमय्या

मुंबईत २००६ मध्ये रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मुंबईतील बॉम्बस्फोटावर आज मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याने धक्का बसला आहे. निश्चितपणे या प्रकरणाचा तपास, कायदेशीर प्रतिनिधित्व आणि न्यायालयीन मांडणी यात त्रुटी राहिल्या असतील, परंतु मुंबईकरांना न्याय हवा आहे. हे जे अतिरेकी आहेत, त्यांना फाशी झालीच पाहिजे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की, चांगली तपास समिती, लीगल टीमची रचना करा आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जा.”

10:47 (IST) 21 Jul 2025

७ /११चा उपनरीय लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट खटला; सर्वच्या सर्व १२ आरोपींची १९ वर्षांनंतर निर्दोष सुटका

या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले. …वाचा सविस्तर
10:44 (IST) 21 Jul 2025

सत्र न्यायालयाचा २०१५ चा निर्णय उच्च न्यायालयाने फिरवला

२०१५ मध्ये, एका विशेष न्यायालयाने या प्रकरणात १२ जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोषींना शिक्षा झाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तर दोषींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील केले होते.

10:39 (IST) 21 Jul 2025

“मला एक नागरिक म्हणून दुःख”, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मला या खटल्याविषयी जास्त माहिती नाही, पण प्रथमदर्शनी ही बाब स्पष्ट होते की, सत्र न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाने फिरवला. याचा अर्थ असा की, मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने ज्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा दिली होती, ते अग्राह्य मानले आणि आरोपींची मुक्तता केली. यामुळे मला एक नागरिक म्हणून दुःख आहे, ते सर्वांनाच झाले असेल यात शंका नाही.”

10:28 (IST) 21 Jul 2025

“मराठी बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला”, परप्रांतीय महिलेची अरेरावी; Video व्हायरल

Marathi: तत्पूर्वी १८ जुलै रोजी लोकल ट्रेनमध्ये ‘मराठी येत नसेल तर मुंबईतून चालते व्हा’ असे सांगत महिला आक्रमक झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. …वाचा सविस्तर
10:25 (IST) 21 Jul 2025

Marathi News Live Updates : २००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपी निर्दोष मुक्त; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

सोमवारी एका ऐतिहासिक निकालात, मुंबई उच्च न्यायालयाने २००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने असे म्हटले की अभियोजन पक्ष त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात “पूर्णपणे अपयशी” ठरला आहे.