Maharashtra Breaking News Live Updates, 14 October 2025 : महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. राज्यातील विरोधी नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासंदर्भात निवेदन देणार आहेत. दुसऱ्या बाजूला, पुण्यातील वाडिया महाविद्यालयात मनविसेच्या पोस्टरवरून अभाविप व मनविसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्याच्या चर्चेदरम्यान आता प्रहार जनशक्ती पार्टीसाठी दिलेली जागा जनता दल (सेक्युलर) या पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारने या निर्णयासह माजी मंत्री बच्चू कडू यांना दणका दिला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप अडचणीत येण्याची शक्यता आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांनी जगतापांना समन्स बजावलं असून बीडमधील मोर्चा सोडून मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी भाजपा नेते रामदास तडस यांनी केली आहे. अजित पवार तीन टर्म या संघटनेचे अध्यक्ष असून या काळात महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचा आरोपही तडस यांनी केला आहे.

Live Updates

Maharashtra Marathi News Updates : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घटनांचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.

11:50 (IST) 14 Oct 2025

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४५ लाख मतांची चोरी : संजय राऊत

शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 45 लाख मतं वाढली आहेत त्याचा हिशेब द्यायला निवडणूक आयोग तयार नाही. नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदान झाल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही. असे अनेक विषय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रासमोर मांडायचे आहेत. तुम्ही मतं चोरणार असाल तर निवडणुकी आयोगावर विश्वास ठेवणार कसा?

10:56 (IST) 14 Oct 2025

प्रेयसी हत्या प्रकरण:”मेरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत”; प्रियकराने केली होती गळा कापून हत्या

मेरी मानसिक तणावात होती. यातून हे सर्व घडलं असल्याचा आरोप मेरीच्या कुटुंबीयांनी केला. मेरीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. ते थांबवावे अशी विनंती देखील कुटुंबीयांनी केली आहे. …अधिक वाचा
10:42 (IST) 14 Oct 2025

खड्डे व मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई

खड्डे व उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्या व्यक्तीचं कुटुंब नुकसानभरपाईसाठी पात्र आहे असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा व्यक्तींच्या वारसांना दोन महिन्यांत सहा लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

10:14 (IST) 14 Oct 2025

मविआसह मनसेचं शिष्टमंडळ आज मुख्य निडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आज (मंगळवार, १४ ऑक्टोबर) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणे ही महत्त्वाचे मानले जाते.