Latest Marathi News : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली आहे. ही कविता व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेने (शिंदे) त्यावर आक्षेप घेत हॅबिटॅट स्टुडिओची (जिथे कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला होता) तोडफोड केली. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या. अद्यापही यावरून गोंधळ चालू आहे. यासंबंधीच्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर नागपूर हिंसाचारप्रकरणातील दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. याप्रकरणी सुरू असलेली कारवाई, तपास व राजकीय प्रतिक्रियांचा आढावा आपण घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून अधिवेशनात काय-काय घडतंय याचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर सोमवारी बुलडोझर चालवण्यात आला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काही वेळापूर्वी कोल्हापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. तिथे काय घडतंय याबाबतच्या बातम्या तुम्हाला इथेच वाचायला मिळतील.
Maharashtra News Live Today, 25 March 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी
कासा : भात (धान) खरेदी केंद्राला आग
आग नियंत्रणात येत नसल्यामुळे कासा पोलिसांनी अग्निशमन डहाणू येथील अदानी औष्णिक ऊर्जा केंद्र आणि तारापूर एमआयडीसी येथून अग्निशमन दलाला पाचारण केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास किलोमीटर ७८ येथे खासगी प्रवासी बसचा अपघात झाला.
डोंबिवलीत सम्राट चौकात अधिकाऱ्यांनी बेकायदा इमारत उभी राहत असताना का रोखली नाही? उच्च न्यायालयाची विचारणा
पंडित दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौकाजवळ साई केअर रुग्णालयासमोर (जय हिंद काॅलनीत जाण्याचा वळण रस्ता) तिरूपती छाया नावाने (मोरे टाॅवर) सचिन सुधीर प्रधान आणि इतर दोन जणांनी या बेकायदा इमारतीचे २०२० मध्ये बेकायदा बांधकाम केले.
पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकाऱ्यांचे अश्रू अनावर
साहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या स्वीय साहाय्यक म्हणून पल्लवी सरोदे या कार्यरत होत्या.
बोकडवीरा परिसरात बारा तास वीज गायब
उरण : बोकडवीरा आणि द्रोणागिरी परिसरातील वीज पुरवठा रविवारी रात्री १२ ते सोमवारी दुपारी १२ असे बारा तास खंडित होता. त्यामुळे येथील नागरिकांना रात्रभर उकाड्यात त्रास सहन करावा लागला. गावाशेजारील महाजनकोच्या वायू विद्युत केंद्रातून या गावाला वीज पुरवठा केला जात आहे. मात्र या गावाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड होऊन वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.
पावसाळ्यातही या समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. रविवारी रात्री या परिसरातील वीज गायब झाली. त्याच्या दुरुस्तीचे काम महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अल्प काळासाठी विज आली होती. त्यानंतर पुन्हा पुरवठा खंडित झाला. दुपारी १ वाजताच्या दरम्यान हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. या संदर्भात उरणच्या महावितरणचे अतिरिक्त अभियंता जयदीप नानोटे यांनी वीज दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वीज पूर्ववत सुरू होईल अशी माहिती दिली.
नेरुरकर चषक खो खो स्पर्धा; कोल्हापूर, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक संघाची विजयी सलामी
कोल्हापूर : राज्य शासनाच्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सोमवारी महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर नाशिक, पुरुष गटात पुणे, किशोर गटात यजमान कोल्हापूर, धाराशिव, किशोरी गटात सोलापूर, सांगली जिल्हा संघानी विजयी सलामी दिली. स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण ४०4 संघसमावेश असून पुरुष व महिला संघांची अ, ब, क आणि ड या चार गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात 3 आहेत.
‘या’ ठिकाणी जाळला जातो १२ क्विंटल कापूर, गुढी पाडव्याला यात्रा..
अमरावती : १ जानेवारी हा वैश्विक नवीन वर्षारंभाचा दिवस मानला जात असला तरी, भारताच्या प्रत्येक राज्य, समुदायाचे स्वत:चे नवीन वर्ष असते. असाच एक नवीन वर्षाचा सण म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी प्रत्येकाच्या दारात गुढी उभारली जाते. याच दिवशी अमरावती जिल्ह्यातील एका गावात यात्रा भरते. यात्रेच्या दिवशी हजारो भाविक श्रद्धेपोटी कापूर जाळतात.
वायदे बाजारातील सात कृषी मालाला एक वर्ष प्रतिबंधाची मुदत वाढ
लातूर : वायदे बाजारात कृषी क्षेत्रातील सात वाणांना गेल्या पाच वर्षापासून प्रतिबंध करण्यात आला असून आता नव्याने 31 मार्च 2026 पर्यंत हा प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड( सेबी )यांच्या वतीने 19 डिसेंबर 2021 रोजी कृषी क्षेत्रातील भात ,गहू ,हरभरा ,मोहरी ,सोयाबीन, क्रूड फॉर्म ऑइल ,व मूग या सात वाणावर प्रतिबंध घालण्यात आला. वायदे बाजार हा शेतकऱ्याला आपल्या शेतमालाला भविष्यात भाव कसा मिळेल ?याचा अंदाज येण्यासाठी सुरू करण्यात आला होता व याचा चांगला लाभ शेतकऱ्यांना मिळत होता .यात काही त्रुटीही होत्या त्या त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून केंद्र सरकारकडे करण्यात येत होती मात्र त्रुटी दूर करण्याऐवजी केंद्र सरकारने 19 डिसेंबर 2021 रोजी सात वाणांना वायदे बाजारात बंदी करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यासमोर बाजारपेठेत जो भाव असेल त्या भावाने शेतमाल विकावा लागतो. भविष्यात भाव काय होऊ शकतो याचा अंदाज शेतकऱ्याला कळत नसल्यामुळे तो अडचणीत येतो आहे. केंद्र सरकारने ती बंदी लादल्यानंतर प्रत्येक वेळी त्याला मुदतवाढ देत गेले आता नव्याने 24 मार्च 2025 रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार 31 मार्च 2026 पर्यंत प्रतिबंधाला मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे आणखीन एक वर्ष शेतकरी वायदे बाजारापासून वंचित राहणार आहे.
रायगड,बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक; डॉक्टर विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव बोगस डॉक्टराने केलेल्या उपचारांमुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रंगराव कुंभार असे तथाकथीत डॉक्टरचे नाव आहे.शंकर कुंभार हे कुडगाव परिसरात गेली १५ वर्ष दवाखाना टाकून रुग्णांवर उपचार करत होते. कुडगाव मधील एक महिला त्यांच्याकडे तपासणी साठी आली होती.
डोंबिवली, पलावा, निळजे भागात घरफोड्या वाढल्या, १० लाखाचा ऐवज लंपास
डोंबिवली : मागील काही दिवसांपासून बंद घरांवर पाळत ठेऊन त्या घरांमध्ये चोऱ्या करण्याचे प्रमाण डोंबिवली, पलावा, निळजे परिसरात वाढले आहे. या घरफोड्यांच्या माध्यमातून चोरट्यांनी दहा लाखाहून अधिक रकमेचा ऐवज, रोख रक्कम चोरून नेली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी भागात माॅडेल शाळा परिसरात एका सोसायटीत सिध्देश मांजरेकर हे नोकरदार राहतात. गेल्या आठवड्यात त्यांचे घर दोन दिवस बंद असताना चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या लोखंडी संरक्षित दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे सुमारे आठ लाख ९६ हजाराचे दागिने चोरट्याने चोरून नेले. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मांजरेकर यांनी तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एच. डी. राऊत तपास करत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील खोणी पलावा भागात कासा ॲन्ड्रीना सोसायटीत युवराज नाईक राहतात. ते नोकरदार आहेत. गेल्या आठवड्यात नाईक यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील शय्या गृहातील कपाटात ठेवलेले एक मनगटी घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. नाईक यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयात हजर करणार
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी त्याला कोल्हापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. थोड्याच वेळात न्यायालयाचा निकाल समोर येईल.
“२०१४ मध्ये भाजपाच्या वरिष्ठांनी युती तोडली, फडणवीस मात्र…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, २०१४ साली भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. त्यांना युती तोडायची होती. ते तसं ठरवूनच आले होते. इथे केवळ चर्चेचं गुऱ्हाळ चालू होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा आणि शिवसेना संपवावी असा भाजपाचा हेतू होता. १४७ व १५१ जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा चालू होती. मी प्रामाणिकपणे सांगतो की देवेंद्र फडणवीस हे तेव्हा युती तोडण्याच्या विरोधात होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठांनीच युती तोडली.