नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांनी बुधवारी खासदार अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानातल्या गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर चव्हाण यांचे स्थानिक राजकारणातील प्रतिस्पर्धी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी गेले असता ‘वर्षा’त विराजमान झालेल्या गणरायांची आरती करण्याचा मान चिखलीकरांना मिळाला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणरायांच्या दर्शनासाठी अनेक मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षांचे आमदार उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आरती करण्याचा मान चिखलीकरांना मिळाला. स्वतः फडणवीस, त्यांच्या मातोश्री सरोजाताई आणि पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होते. आरती पार पडल्यानंतर आमदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळ्या मागण्यांच्या निवेदनाची जंत्री सादर केली.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व अन्य मंत्री उपस्थित होते. नांदेड जिल्हा बँकेतल्या प्रस्तावित नोकरभरतीस सहकारमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली होती. ही मान्यता मिळविण्यात चिखलीकर यांनी पुढाकार घेतला होता. पण गेल्या महिन्यात या नोकरभरती संदर्भाने स्थानिक पातळीवर बरीच ओरड झाली.

त्रयस्थ संस्था नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविताना बँकेने कमी दर नमूद करणाऱ्या दोन संस्थांना डावलून पुण्यातील एका संस्थेला परीक्षेचे काम देण्याचे निश्चित केले होते. या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेवरूनच करण्यात आली. विभागीय सहनिबंधकांचा अहवाल शासनाला सादर झालेला आहे. या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांच्या मुख्यमंत्र्यांकडील भेटीमध्ये नेमके काय घडले ते समोर आलेले नाही.

भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांनी बँकेतल्या नोकरभरतीसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती तर चिखलीकर यांनी बुधवारी थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतली. नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार या तालुक्यांसह अन्य तालुक्यांनाही ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि पुराचा जबर तडाखा बसला. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचे मोठे नुकसान झाले असून या आपत्तीतून त्यांना सावरण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे चिखलीकर यांनी कळविले आहे.