Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Updates, 2 October: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे नेमके कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार? याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आगामी पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंशी युती होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्याचबरोबर उद्दव ठाकरेंनी यावेळी पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबतच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
UBT Shivtirth Dadar Dasara Melava 2025: उद्धव ठाकरे आज काय बोलणार? ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!
Sanjay Raut Dasara Melava Speech : मुंबईतील रावणाला बुडवा; दिल्लीतील रावणाला जाळा – शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Speech Live: इथून पुढे ‘हाच’ आपला कार्यक्रम – उद्धव ठाकरे
प्रश्न विचारावेच लागतील. मोदींनी २०१४ साली चाय पे चर्चा केली होती. तिथूनच सुरुवात करा. तेव्हा चहाची किंमत किती होती आणि आज किती झाली. प्रत्येक टपरीवर बसून भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा. महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा, हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करा नाहीतर मराठवाड्यात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. कसे देत नाहीत? शेतकऱ्यांचा हक्क आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल, त्या अन्यायावर वार केला पाहिजे. देशात जे अंधभक्त झालेत त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढणं आणि हिंदुत्व काय आहे हे दाखवून देणं हाच आपला इथून पुढचा कार्यक्रम – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
UBT Shivtirth Dadar Dasara Melava Live 2025: गोमांस वादावरून भाजपावर टीकास्र
भाजपाला मी सांगतोय की हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, तुमच्या सगळ्या टोप्या घातलेल्या फोटोंचं प्रदर्शन मी भरवेन. एका राज्यात गोवंश हत्याबंदी. महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व. २-३ वर्षांपूर्वी उत्तरेकडच्या राज्यात आर्यन मिश्रा नावाच्या २२-२३ वर्षांच्या मुलाचा पाठलाग करून बोगस गोरक्षकांनी गोळ्या घालून त्याला मारलं. त्यांना पकडलं की नाही अजून माहिती नाही. किरन रिजिजूंनी सांगितलंय की तिथे त्यांच्या राज्यात गोमांस खातात. मग त्यांना अजून लाथ मारून का नाही काढलं? तुमची व्याख्या एकदा काय ती नक्की करा. मी भाजपाला प्रेमानं सांगतोय. प्रत्येक वेळी आगपाखड करायची गरज नाही – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
UBT Dasara Melava 2025 Shivtirth Dadar Mumbai Live: राज ठाकरेंशी युतीबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
काहींची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार? उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का? आरे मग ५ जुलैला काय केलं होतं आम्ही? तेव्हा मी बोललोय आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही. पण आमच्यावर सक्ती करायची नाही. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एकेक प्रांत मिळाला. मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. पण महाराष्ट्राला मुंबई मिळाली नव्हती, मराठी माणसानं रक्त सांडून मिळवली. ती जर व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल, तर खिसा फाडून ती परत मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
UBT Dasara Melava 2025 Shivtirth Dadar Mumbai Live: उद्धव ठाकरेंनी दिलं राजेश खन्नांच्या चित्रपटाचं उदाहरण
यांनी जीएसटी की केला. पण मग लावला कुणी होता? नेहरूंनी लावला होता का? गेली ८ वर्षं तुम्ही संपूर्ण देशाला लुटलंत. १२५लाख कोटी रुपये तुम्ही खिशात घालून बसलात. मला राजेश खन्नाचा चित्रपट आठवला. त्याच्याकडे काही हॉटेलवाले येऊन सांगतात अमुक पदार्थाची किंमत वाढवली तर लोक ओरडतील. तो म्हणतो किती किंमत वाढवायचीये. ते म्हणतात दुप्पट. हा म्हणतो तिप्पट करा. लोक रस्त्यावर उतरली, आंदोलन करतील. तोडफोड करतील. मग लोक माझ्याकडे येतील. मग मी हॉटेलवाल्यांना बोलवून सांगेन की तिप्पट नको, दुप्पट करा. म्हणजे सगळ्यांचं काम होईल. अशा पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय? – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
UBT Shivtirth Dadar Dasara Melava Live 2025: स्वाभिमानी मतदार व्हायचंय की भाजपाचे पगारी मतदार – उद्धव ठाकरेंचा जनतेला सवाल
मी दौऱ्यावर असताना काहीजण मला म्हणत होते की साहेब तुम्हा आम्हाला परत हवे आहात. निवडणुका आल्यानंतर महिलांच्या खात्यात १५०० रुपये टाकले गेले. काही प्रमाणात ही गोष्ट मान्य करायला हवी की जिथे खायला अन्न नाही, तिथे हे पैसे मिळत असतील तर महिला थोड्याशा समाधानी होतील. पण तो शेतकरी मला म्हणाला ही भाजपाची अवलाद पगारी मतदार तयार करत आहे. आता महाराष्ट्रानं ठरवायचंय की आपण भाजपाचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार होणार. माझी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून आपले एक फुल आणि दोन हाफ दिल्लीत जाऊन बसायला हवे होते की महाराष्ट्र आज बुडतोय तर केंद्राकडून आम्हाला भरघोस मदत द्या. पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे. फडणवीसांचा अभ्यास चालू आहे. त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात. जरा काही हातावर टिकवलं की निवडणुका आपण जिंकून जाऊ – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Speech Live: आशिया कपमधील सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
आशिया कपमध्ये पाकिस्तानशी क्रिकेट मॅच झाली. ती जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो, तो माणूस बेशरम आहे. तुम्हीच सांगितलं की पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या. मग एक तर तुमचं सरकार असताना हिंदू सुरक्षित नाही. अतिरेकी आलेल्या देशाशी तुम्ही क्रिकेट खेळता. एकीकडे बाप देशप्रेमाचं नाटक करतो आणि दुसरीकडे पोरगा पाकिस्तानशी क्रिकेट खेळतो? – उद्धव ठाकरे यांचा सवाल
UBT Shivtirth Dadar Dasara Melava Live 2025:
मोहन भागवत मुस्लीम संघटनांच्या बैठकीत जात आहेत. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांची हिंमत आहे का की मोहन भागवतांना देशद्रोही म्हणतील? – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Speech Live: उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल
मला मोहन भागवतांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवणार असाल, तर तुमच्या थडग्यावरचा हिरवा आधी काढा आणि मग आमच्या अंगावर या. १०० वर्षं आपएसएसला झाल्यानंतर माझं त्यांना विचारणं आहे.. हे चेलेचपाटे तुमच्यासमोर आहेत ते पाहून तुम्हाला समाधान मिळतंय का? ही विषारी फळं तुमच्या झाडाला लागली आहेत. कदाचित भागवतांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण त्यांचा ब्रह्मराक्षस झालाय. आमच्या अंगावर हिंदुत्व म्हणत येताना मोहन भागवतांनी गेल्या काही वर्षांत म्हटलंय ते पाळता का? – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
UBT Shivtirth Dadar Dasara Melava Live 2025: देवेंद्र फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत – उद्धव ठाकरे
भाजप म्हणजे अमीबा झालाय. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो. पण शरीरात शिरला तर पोटदुखी होते. म्हणून मी भाजपाला अमीबा म्हणतो. मुख्यमंत्री आम्हाला शिकवतायत. पण मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेनं सर्वे केलाय गेल्या दोन-तीन महिन्यांत. आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. हे महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं. पण या नव्या सर्वेमध्ये सगळ्यात लोकप्रिय नेत्यांमध्ये योगी, ममता, चंद्राबाबू, नितीश कुमार, स्टॅलिन, पिनरायी विजयन, मोहन यादव, हेमंता बिस्व सरमा आणि दहाव्या क्रमांकावर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षाध्यक्ष
तीन वर्षं मणिपूर जळतंय. कालपरवा मोदी तिकडे गेले. तिथल्या महिलांची धिंड काढली जाते. पण ना मोदी गेले, ना दुसऱे व्यापारी गेले. आम्हाला वाटलं मोदी काही तोडगा काढतील. अत्याचार झाले त्यांचं काही सांत्वन करतील. पण तिथे त्यांनी केलेलं भाषण ऐकून हसावं की रडावं कळेना. ते म्हणतात मणिपूर के नाम मेंही मणी है. तिथे जाऊन तुम्हाला मणी दिसला, मग तिथल्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं? – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
सरकारनं जनसुरक्षा कायदा आणला. आपण त्याला विरोध केलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांनी त्याचं समर्थन केलं. पण त्याचा गैरवापर होतोय हे उदाहरणासकट सांगतो. सोनम वांगचुक हा एक चांगला देशभक्त आहे. लेह-लडाखसारख्या दुर्गम थंडीच्या भागात आपले जवान उबदार राहावेत म्हणून सोलार तंत्रज्ञानावर छावण्या बांधून दिल्या. पाणी मिळावं म्हणून आईस स्तुपाची योजना आणली. काल-परवापर्यंत ते मोदींची स्तुती करत होते. पण त्यांनी आंदोलन सुरू केलं. लेह-लडाखला न्याय्य हक्क मिळालाच पाहिजे. त्यांनी उपोषण केलं. पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. मग पेटलं सगळं. आंदोलन रस्त्यावर केलं. सरकारनं सरळ त्यांना रासुकाखाली अटक केली. आता वर्षभर बाहेरच येऊ शकणार नाही. हा जनसुरक्षा कायदा आहे – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. १०० वर्षं ही थोडीथोडकी वर्षं नाहीयेत. संघाची १०० वर्षं पूर्ण होतायत आणि नेमकी गांधी जयंती आहे. याला योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
यांची २०१७ सालची कर्जमुक्ती अजून शेतकऱ्यांना मिळत नाहीये – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
मी काल मुद्दाम पत्रकार परिषद घेतली. आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा. आता तेच मुख्यमंत्री झाल्यावर बोलतायत की ओला दुष्काळ ही संज्ञाच नाहीये. जनता संकटात आहे. खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा आणि त्यांना आधी मदत करा. सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केलीच पाहिजे. आपलं सरकार असताना मी कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईनं स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे. शेतकऱ्यांच्या घरादाराचा चिखल झाला आहे. शेती वाहून गेली आहे. राहायचं कुठे? शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती. आजपर्यंत मराठवाडा दुष्काळग्रस्त झाला होता. आता तिथे अतीवृष्टी झाली आहे – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Speech Live: उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली आहे. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच – उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अशी जिवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यातलं सोनं असतं. म्हणूनच अनेक पक्षांचा शिवसेना फोडण्याकडे डोळा आहे. त्यांना असं वाटलं की काही जणांना त्यांनी पळवलंय. पण जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे – उद्धव ठाकरे, पक्ष अध्यक्ष
मुंबईच्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या या लोकांनी केल्या आहेत. मिळेत ते चोरत आहेत – संजय राऊत, खासदार
शिंदेंनी दिल्लीतून अमित शाहांचे जोडे आणले आहेत. त्यांना शस्त्रपूजा करण्याची गरज नाही. ते त्या जोड्यांची पूजा करतील. जो तो आपल्या लायकीनुसार जगतो आणि वागतो – संजय राऊत, खासदार
अनेकांनी शंका उपस्थित केल्या की शिवतीर्थावर चिखल झालाय, मग तुम्ही चिखलफेकच करणार. मी म्हटलं होय, गद्दारांवर चिखलफेकच करणार. त्यांची तीच लायकी आहे. संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा चिखल आहे. मग दोन तास आपण चिखलात उभं राहिलो तरी काही हरकत नाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल, तर आज आमचा ओला दसरा आहे – संजय राऊत, खासदार
होय गद्दारांवर आम्ही चिखलफेकच करणार-संजय राऊत
शिवतीर्थावर चिखलफेकच करणार, कारण शिवाजी पार्क मैदानावरुन चिखलच फेकायचा आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर आमचा ओला दसरा मेळावा आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
६८ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी जी ठिणगी टाकली, त्याचा वणवा या पावसानंही विझणार नाही. आत्तापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा. आता पाऊस पडत असूनही हजरोंच्या संख्येनं तुम्ही इथे जमले आहात – संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Live: कर्जमाफीबाबतचे देवेंद्र फडणवीस व अजित पवारांचे व्हिडीओ…
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे – देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं होतं. पण अजित पवार म्हणाले की ३० तारखेपर्यंत कर्जाचे हप्ते भरा – अंबादास दानवेंनी मोबाईलवर ऐकवले देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे व्हिडीओ
‘देवाभाऊ’च्या १०० कोटीच्या जाहिराती दिल्या. बेनामी पैसे दिले गेले. देवाभाऊच्या या बहिणी विधवा होत आहेत. पण या भावाला त्याची चिंता नाही. देवाभाऊसारखे मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणावर जाहिराती देतात. एक उपमुख्यमंत्री नातवाला देण्यासाठी ८० कोटींची कार घेतात. पण देवाभाऊ नंतर सांगतात की ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं होतं. त्यात परतीच्या पावसात तातडीने मदत करावी असं म्हटलं आहे. त्यात म्हटलंय की झालेलं नुकसान पाहाता ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषानुसार ही मदत जाहीर केली पाहिजे असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी पत्रात म्हटलंय. मग तुम्ही कसं म्हणता की तुम्हाला ओला दुष्काळ ही संकल्पना माहिती नाही? – अंबादास दानवे, ठाकरे गट
देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत, २०२० च्या पत्राचा उल्लेख करत दानवे काय म्हणाले?
देवाभाऊ १०० कोटींच्या जाहिराती देतात आणि सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही. २०२० मध्ये फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. नुकसानीची व्यापकता पाहून ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांनीच पत्रात म्हटलं होतं. आता फडणवीस काय करत आहेत? असा प्रश्न अंबादास दानवेंनी विचारला आहे.
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Live: उद्धव ठाकरेंचं शिवाजी पार्कवर आगमन
दादरच्या शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत.
पीकविम्याचे नियम शिथिल झाले पाहिजेच. सरकारनं खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गळ्याला नख लावलं आहे – अंबादास दानवे, ठाकरे गट
भोरचे आमदार थोपटेंच्या कारखान्याला ४०९ कोटी, विखेंच्या कारखान्याला २१८ कोटी रुपयांचं कर्ज दिलं गेलं. हे कर्ज राज्याच्या हिताचं नाही. शेतकऱ्याची ५० हजाराची, २ लाखांची हमी तुम्ही घेऊ शकत नाही. पण अशा धनदांडग्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर थकहमी दिली जाते. त्यामुळे हे सरकार शेतकरीविरोधी आहे – अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते
ऊस उत्पादक शेतकऱ्याचं कारखान्याकडच्या पेमेंटमधलं प्रत्येक टनातले १५ रुपये सरकारनं मदतीसाठी घेण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आपल्याच शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे सरकार करतंय – अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी सर्वात मोठे आव्हान कोण? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी मीच मोठे आव्हान आहे.
UBT Shivtirth Dadar Dasara Melava 2025: ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबतच्या बातम्या एका क्लिकवर