सांगली : पंढरीच्या विठ्ठलदर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी चार विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे सांगलीसह कोल्हापूर व कर्नाटकातील विठ्ठल भक्तांची सोय होणार आहे.
दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यासाठी अनेक भाविक पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. आषाढीसाठी पुणे-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज, कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डूवाडी, मिरज- पंढरपूर- सोलापूर- कलबुर्गी आणि नागपूर-पंढरपूर-मिरज या चार विशेष गाड्या धावणार आहेत.
नागपूर-मिरज ही गाडी ४ व ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर, मिरजेच्या दिशेने सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पंढरपुरात, तर मिरजेत दुपारी १२ वाजता पोहोचेल. यानंतर मिरजेतून दुपारी १ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. ही गाडी मिरज ते पंढरपूर दरम्यान बेळंकीवगळता सर्व स्थानकांवर थांबेल.
पुणे-पंढरपूर-मिरज ही गाडी ३ ते ७ जुलै दरम्यान कुर्डूवाडीमार्गे धावेल. पुण्यातून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी सुटून पंढरपूर येथे दुपारी ४ वाजता, तर मिरजेत सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात मिरजेतून रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी सुटून पंढरपूर येथे रात्री १० वाजता, तर पुण्यात पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. ही गाडी मिरज ते पंढरपूर दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल.
कोल्हापूर-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी १ ते १० जुलै दरम्यान धावणार आहे. कोल्हापूर येथून पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी सुटून मिरजेत सकाळी साडेसातला, तर पंढरपूर येथे दुपारी सव्वाबाराला, तर कुर्डूवाडी येथे दीड वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कुर्डूवाडी येथून दुपारी चार वाजून ४० मिनिटांनी सुटेल. पंढरपूर येथे साडेपाचला, मिरजेत रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी, तर कोल्हापूरला रात्री साडेदहा वाजता पोहोचेल.
मिरज-कलबुर्गी गाडी एक ते १० जुलै दरम्यान मिरजेतून पहाटे पाच वाजता सुटेल. ती पंढरपूर येथे सात वाजून चाळीस मिनिटांनी, सोलापूर येथे ११ वाजता, तर कलबुर्गी येथे दुपारी दीड वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कलबुर्गी येथून दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल. पंढरपूर येथे रात्री ८.५५ वाजता, तर मिरजेत रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी मिरज-पंढरपूर दरम्यान सर्व ठिकाणी थांबेल.