मुंबई : राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याचा आदेश ११ सप्टेंबर रोजी काढला. गृहमंत्रालयाचे सहसचिव राजेश होळकर यांनी ही अधिसूचना जारी केली. तसेच भारतीय रेल्वेने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर ठेवल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले.
अहमदनगरचे नाव राज्य सरकारने बदलले असले तरी, केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध विभागांची नावे अहमदनगर अशीच होती. अशावेळी अनेक नागरिकांना सरकारी कामे करताना अडचणी येत होत्या. परंतु, आता केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. त्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली. त्यानुसार अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन म्हणून भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर असे ठेवले.
पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानकाचे आता अधिकृतपणे अहिल्यानगर असे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आणि भारताच्या सर्व्हेअर जनरलच्या पत्रानुसार रेल्वे स्थानकाचे नवीन नाव ‘अहिल्यानगर’ करण्यात आले आहे. तर, या रेल्वे स्थानकाच्या स्थानक कोडमध्ये कोणताही बदल होणार नाही. अहिल्यानगर स्थानकाचा कोड ‘एएनजी’ असाच राहील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने याबाबत ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली. अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथील कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अहमदनगर महापालिकेकडे नामांतराचा ठराव करण्याची सूचना पाठवली होती. प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर प्रशासकीय महासभेत नामांतराचा ठराव करण्यात आला. त्यानंतर महसूल व वन विभागाने अहमदनगर शहर, उपविभाग व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केल्याची अधिसूचना ८ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केली होती.
मराठावाडा मुक्ती संग्राम दिनी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमळनेर – बीड दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बीड – अहिल्यानगर पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. अहिल्यानगर – बीड – परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गिका प्रकल्पाचा हा एक भाग आहे. अहिल्यानगर – अमळनेरदरम्यान रेल्वे सेवा सुरू आहे. तर, आता अमळनेर – बीड या नवीन रेल्वेमार्गिकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.