मुंबई: शिवसेना (ठाकरे) पक्षातून बाहेर पडून अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असतानाच रविवारी ठाकरेंच्या दोन माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष, मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले.

शिवसेना (ठाकरे) पक्षातील चांदिवलीतील माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये आणि माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत या दोन नगरसेवकांनी ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थित होते.

शेवटचा अंक लवकरच पाहायला मिळेल

यावेळी शेलार म्हणाले, या दोन नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे. लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. ठाकरे यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. २०१७ च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाकडे फक्त दोन जागा कमी होत्या.

आतापर्यंत भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर १चा पक्ष झाला असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. शिवाय ठाकरे यांच्या शिवसेनेतील ५० हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले. त्यामुळे ठाकरे यांचा पक्ष अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

पक्षांमध्ये चढाओढ

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून एक एक जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. पक्षप्रवेशालाही वेग येऊ लागला आहे. मुंबई महापालिकेवर गेली २५-३० वर्षे सत्ता असलेल्या शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणूकीत शिवसेनेच्या दोन गटात खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षातून अनेक माजी नगरसेवक फोडून त्यांना आपल्याकडे वळवण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिवसेनेच्या एका गटातून दुसऱ्या गटात जाणाऱ्यांचा ओघ सुरू असतानाच रविवारी ठाकरे यांच्या दोन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला.

दरम्यान, रविवारी पक्ष प्रवेश केलेले ईश्वर तायडे हे २०१२ चे नगरसेवक आहेत तर आकांक्षा शेट्ये या २०१७ च्या नगरसेविका होत्या. त्या तायडे यांच्या नातलग आहेत. भाजपमध्ये आतापर्यंत शिवसेनेतून अश्विनी मते, कॉंग्रेसमधून जगदीश कुट्टी यांनी प्रवेश केला आहे.