मुंबई : राज्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. या कारवाईत पुणे, भिवंडी येथे बनावट नोटांची छपाई करणारे कारखाने उद्ध्वस्त केले. दरम्यान, ७४ लाखांच्या नोटा जप्त केल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागील पाच वर्षात २३७ गुन्हे दाखल असून ५६६ जणांना अटक केल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

राज्यात बनावट नोटांच्या छापखान्यावर कारवाई करण्याबाबतचा तारांकित प्रश्न संजय खोडके यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी यावर दिलेल्या लेखी उत्तरात पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू झाल्याची कबुली दिली आहे. सविस्तर माहिती देताना, पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १७ एप्रिल २०२५ रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत २८.९१ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तर ७ आरोपींना बेड्या ठोकल्या. तर ३ मे २०२५ रोजी भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात ४५.५० लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. या कारवाईत ६ आरोपी अटक केली.

दोन्ही प्रकरणांतील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, याचा कसून तपास सुरू आहे. तसेच जप्त केलेला मुद्देमाल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे.

अशी केली कारवाई

वर्ष – दाखल गुन्हे – अटक आरोपी

  • २०२० – ३४ – ७१
  • २०२१ – ४८ – ९८
  • २०२२ – ४६ – ९९
  • २०२३ – ४० – ८२
  • २०२४ – ६८ – १३८

१५ जून २०२५ पर्यंत – ३७ – ७८.