मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली. दोन्ही उपनगरांतील अनेक सखल भाग जलमय झाल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना प्रचंड हाल सोसावे लागले. दरम्यान, सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने काही ठिकाणी मॅनहोलची झाकणे उघडली. तसेच, मनुष्यबळाच्या साहाय्याने देखील पाण्याचा निचरा करण्यात आला.

मुंबईत रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळीही कोसळणाऱ्या मुसळधारांनी अनेक भाग जलमय केले. अंधेरी भुयारी मार्ग, अंधेरी मार्केट, रामनगर भुयारी मार्ग, अंबोली, जुहू बस टर्मिनल आदी भागात पाणी साचल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. तसेच, घास कंपाऊंड व कुर्ल्यातील जंगलेश्र्वर रोडवर पाणी साचले होते. विलेपार्ले येथील एस. व्ही. मार्ग, पार्क रोडवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. वाकोला मार्केट, शीव येथील प्रतीक्षा नगरातील नागरिकांनाही साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागला.

कुर्ला, टिळक नगर परिसरातही पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती. मुसळधारांचा फटका अंधेरीतील वीरा देसाई मार्गावरील वाहतूकीलाही बसला. गोरेगाव, साकीनाका भागातील अनेक परिसर सोमवारी जलमय झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक देखील संथ गतीने सुरू होती. या महामार्गावरील (WEH) पंप हाऊसजवळ पाणी साचल्यामुळे होणारा वाहतूक खोळंबा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत उत्तर दिशेच्या पदपथावरील नाल्याचे झाकण उघडून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा केला.

महानगरपालिकेने यंदा पावसाळापूर्व नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा केला होता. तसेच, पाणी तुंबण्याच्या समस्या कमी होणार असल्याचेही सांगितले आहे. मात्र, मुसळधार पाऊस कोसळताच काही वेळातच अनेक भागांमध्ये पाणी तुंबत असल्याने पालिकेवर प्रचंड टीका होत आहे. नालेसफाईच्या कामांवरून अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी काही ठिकाणी मॅनहोलची झाकणे उघडण्यात आली होती, तर काही ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून पाण्याचा निचरा केला जात होता. त्यामूळेही अनेकांनी संताप व्यक्त केल्या.

पडझडीचे सत्र सुरूच…

मुंबईत पावसाने जोर धरल्यापासून सतत पडझडीच्या घटना घडत आहेत. मुसळधार पावसात सोमवारी शहरात ३, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण सहा शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. महापालिकेकडे तक्रार प्राप्त होताच विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले. तसेच, शहरात २, पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात अशा मिळून एकूण ८ ठिकाणी झाड, फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. पालिकेच्या संबंधित विभागाकडून फांद्या तोडणे, तसेच त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.