मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला असून सोमवारी मध्यरात्रीही मुसळधार पाऊस कोसळत होता. शहर, तसेच उपनगरात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर राज्यातही पावासाचा जोर वाढला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. शहर आणि उपनगरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत सोमवारी दिवसभर पावसाचा जोर होता. त्यानंतर पावसाने काही कालावधी विश्रांती घेतली. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. अनेक भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या २४ तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० दरम्यान विक्रोळी येथे सर्वाधिक २५५.५ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भायखळा येथे २४१ मिमी , सांताक्रूझ २३८.२ मिमी, जुहू २२१.५ मिमी, वांद्रे २११, कुलाबा २१०.४ मिमी आणि महालक्ष्मी येथे ७२.५ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्टचा पहिला पंधरवडा कोरडा गेला. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह ठाणे, पालघर भागात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. याचबरोबर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.
शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी
मुंबईत मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने महापालिकेने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे सोमवारी दुपारच्या सत्रातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
आज पावसाचा इशारा कुठे
अतिवृष्टी (रेड अलर्ट)
रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर
अतिमुसळधार ते अतिवृष्टी (ऑरेंज अलर्ट)
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, सातारा घाट परिसर
मेघगर्जनेसह पाऊस
जालना, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, अमरावती , अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर
पावसामुळे ८ जणांचा बळी
राज्यात झालेल्या पावसामुळे आठ जणांचा बळी गेला आहे. नांदेड जिल्ह्यात पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. बीडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अकोल्यामध्ये भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईतील मलबार हिल परिसरात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली नद्यांनी, तसेच रायगड जिल्ह्यामधील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.