मुंबई : संपूर्ण राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असून मागील दोन तीन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील पिकांचे, गावांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही सुरु झाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने जाहीर केलेल्या चार आठवड्याच्या सुधारित अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात ( १८ ते २५ सप्टेंबर) दक्षिण भारत, महाराष्ट्रासह गुजरातच्या काही भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर असा चार आठवड्यांचा सुधारित अंदाज जाहिर केला आहे. त्यानुसार पहिल्या आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारत आणि ईशान्य भारतातील बहुतेक भागांत सामान्य प्रमाणापेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुसऱ्या आठवड्यात वायव्य भारत, मध्य भारत, पश्चिम भारताच्या तसेच ईशान्य भारतातील अनेक भागांत, कर्नाटक, केरळच्या किनारी भागांत आणि तेलंगणामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आठवड्यात पूर्व भारत, उत्तर पूर्व भारत, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथेही सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

चौथ्या आठवड्यात पूर्व भारत, ईशान्य भारत, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या अनेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक भागात उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही. काही भागात विजांच्या कडकडाटाचा अंदाज आहे.

मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास थांबला

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास रविवारपासून सुरु झाला आहे. पश्चिम राजस्थानमधून रविवारी मोसमी पावसाने माघार घेतली. त्यानंतर मंगळवारी मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, पंजाब, हरियाणामधून पावसाने माघार घेतली. त्यानंतर मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास थांबलेला आहे.

पावसाचा अंदाज कुठे

मेघर्गजनेसह पाऊस – नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, वर्धा

ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. परिणामी तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात तापमान ३० अंशाच्या पुढे नोंदले गेले आहे. ब्रह्मपुरी येथे गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला येथे ३२.५ अंश सेल्सिअस, अमरावती ३२.६ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ३२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.