मुंबई : इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) यादीत आधीच ३५० पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिले.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत, त्या नियमानुसार हे आंदोलन झाले, तर आम्हाला काही अडचण नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही.

ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण हवे, या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सोडविला. इतर कोणीही तो सोडविला नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत भरीव आर्थिक मदत देऊन उद्याोजक तयार करण्यात आले. विद्यार्थी व इतरांना मदत देण्यात आली. आमच्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले असून ते आजवर टिकले आहे आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणि तरुणांना नोकऱ्यांसाठी होत आहे.

ओबीसींमध्ये आज ३५० पेक्षा अधिक जाती आहेत. वैद्याकीय प्रवेशाचे उदाहरण पाहिले, तर ओबीसी अंतर्गत कटऑफ हा आर्थिक व सामाजिक मागासवर्गीयांपेक्षा (एसीबीसी-मराठा) वर किंवा अधिक आहे. तर एसीईबीसीचा कट ऑफ हा आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) कटऑफच्या वर आहे. त्यामुळे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीमुळे समाजातील विद्यार्थ्यांचे नेमके किती भले होणार आहे, याची मला कल्पना नाही. ही आकडेवारी जर नीट बघितली, तर मराठा समाजाच्या हिताचे काय आहे, हे लक्षात येईल.

राजकीय आरक्षण नाही त्यामुळे मराठा समाजाच्या हिताचा विचार करून अभ्यासपूर्वक मागणी करावी, ही मराठा समाजाचीही जबाबदारी आहे. एसीईबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आंदोलनामागे राजकीय आरक्षण हा जर हेतू असेल, तर मात्र गोष्ट वेगळी आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय लाभाचे प्रयत्न

मराठा आरक्षण आंदोलनात यापूर्वी काय झाले, हे सर्वांनी बघितले आहे. आजही आंदोलनासाठी साधनसामग्री (रिसोर्सेस) उभे करणारे कोण आहेत, हे पाहायला मिळत आहे. पण सरकारसाठी हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही त्याकडे सामाजिक चष्म्यातून पाहू. काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांचे नुकसानच होईल, असा इशाराही फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

आंदोलनांमुळे सरकारपुढे पेच

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने जरांगे यांना शुक्रवारी एकच दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली आहे. जास्तीत जास्त पाच हजार कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल, यासह अनेक अटी पोलिसांनी घातल्या आहेत. मात्र जरांगे यांचा मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार आहे. त्यातूनच जरांगे यांनी उद्या आझाद मैदानात ठिय्या मारल्यास सरकारसमोर पेच निर्माण होऊ शकतो.

मराठा समाज व ओबीसींवर राज्य सरकार अन्याय होऊ देणार नाही आणि कोणाचेही आरक्षण काढले जाणार नाही. -देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

ताफा मुंबईत

पनवेल, ठाणे : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानामध्ये शुक्रवारी उपोषण करणार असून त्यांचा ताफा गुरुवारी रात्री नवी मुंबई मार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाला. त्यांच्या स्वागतासाठी पळस्पे फाट्यावर समाजबांधव मोठ्या संख्येने जमले होते.

आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेले सतीश ज्ञानोबा देशमुख (वय ४४) या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जरांगे यांच्या ताफ्याबरोबरच त्यांचे वाहन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील वरगावचे रहिवासी आहेत.

जरांगेंना नागपूरमधून प्रतिआव्हान

नागपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून ओबीसींच्या वाट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ नये म्हणून अशी मागणी करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात शनिवारपासून साखळी उपोषण करण्याची घोषणा केली.