मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, राज्यात रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर सलग काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

राज्यात मागील काही दिवस फारसा पाऊस पडलेला नाही. काही भाग वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पडलेला नाही. मुंबईसह राज्यातील इतर भागात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता फारशी नसेल. त्यानंतर रविवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. मुंबईत पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील. तसेच दिवसा पश्चिमेकडून वारे वाहतील त्यामुळे दिवसाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

मात्र, आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागेल. मंगळवारीही मुंबईत उकाडा जाणवत होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३१.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३१.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तापमानात फारशी वाढ झाली नसली तरी वातावरणातील बदलामुळे ही स्थिती दोन तीन दिवस कायम राहील. दरम्यान, रविवारपासून नैऋत्य मोसमी वारे पुन्हा जोर धरणार आहेत. तसेच वाऱ्यांची चक्रीय स्थिती असेल. त्यामुळे पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईत पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु राहील.

सोलापूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

गेले अनेक दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. तसेच काही भागात उकाडा देखील सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोलापूर येथे मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तेथे ३४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल नागपूर येथे ३४ अंश सेल्सिअस, ब्रम्हपुरी ३३.८ अंश सेल्सिअस आणि वर्धा येथे ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.