मुंबई : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष अभियानांतर्गत मुंबईत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून महिलांना २ ऑक्टोबरपर्यंत या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. त्यातील १०० शिबिरांमध्ये विशेष तज्ज्ञांद्वारे तपासणी आणि उपचार करण्यात येणार असून ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग आदींची तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानात २२२ तपासणी व जनजागृती शिबिरे आरोग्य केंद्रस्तरावर, १०२ विशेष शिबिरे प्रसूतिगृहे व उपनगरीय रुग्णालये येथे असे एकूण ३५० शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करणे, असा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ मध्य प्रदेशमधील धार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच, मुंबई महानगरपालिका स्तरावर स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानाला दहिसर येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या दिवशी ३४ ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक महिलांनी शिबिराचा लाभ घेतला. तर २०० हून अधिक गरोदर महिलांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

तसेच, या अभियानांतर्गत ३३ आहार तज्ज्ञांकडून माता, किशोरी व बालक पोषणविषयक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच, या अभियानात महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, क्षयरोग तपासणी करता येणार आहे.

गर्भवती महिलांची चित्रफितीद्वारे प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन केले जाणार आहे. बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यासाठीही समुपदेशन केले जाईल.

महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. आरोग्याच्या अनुषंगाने प्रत्येक महिलेची चिकित्सा आणि वेळीच उपचारांची कुटुंबाची देखील जबाबदारी आहे. म्हणूनच आपल्या घरातील प्रत्येक महिलेची आरोग्य तपासणी व्हावी, यासाठी आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. कोणतीही महिला कुपोषित राहिल्याने कुपोषित बालक जन्माला येऊ नये, हा पोषण आहार देण्यामागचा उद्देश आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.