मुंबई : शिवाजीपार्कवरील मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीयाच्या मनोमीलनाचा सोहळाच पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल, अशा शुभेच्छांतून सूचक विधान करीत उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांत एकत्रच राहणार असल्याचे संकेत दिले.
शिवाजीपार्क आणि ठाकरे हे समीकरण दीपोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन्ही कुटुंबीयांच्या एकत्रित उपस्थितीने पुन्हा एकदा जुळून आले. कार्यक्रमाची उपस्थितीच दाेघांच्या एकाच गाडीतून केलेल्या प्रवेशाने झाली. त्यांच्याबरोबरच आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे, मिताली ठाकरे ही सर्व भावंडेही एकाच गाडीतून शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे तसेच राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांच्यातील नात्यांचा धागा अधिक घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले.
अनेक वर्षांनंतर ठाकरे कुटुंब अशा प्रकारे एकत्र एका सोहळ्यात पाहण्याचा योग जुळून आला. तीन महिन्यांत सातव्यांदा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची एकत्र भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ही दिवाळी वेगळी आणि विशेष आहे. मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश हा सर्वांना आनंद देत राहील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र राहण्याचे संकेत दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.
शिवाजीपार्क आणि ठाकरे हे एक नाते आहे. मात्र राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर अनेकदा शिवाजीपार्कवरून खटके उडाले होते. कधी मैदानातील सभांच्या परवानगीवरून तर कधी शिवाजीपार्कात उडणाऱ्या धुळीवरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शिवाजी पार्कवर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या काळातील शिल्पांवरूनही वाद निर्माण झाला होता. अगदी मागील वर्षीच विधानसभा निवडणूक काळात आलेल्या दीपोत्सावत झळकलेले मनसेच्या चिन्हांचे कंदील आणि प्रवेशद्वारावरील चिन्हाचे चित्र यावरूनही वाद निर्माण झाला होता. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी तर थेट निवडणूक आयोगापर्यंत ही तक्रार केली होती.
हिंदी सक्तीविरोधाच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र आणि शिवाजीपार्कवरील वादही संपुष्टात आल्याचे मनसेच्या दीपोत्सवानिमित्ताने अधोरेखित झाले.
