बुलढाणा: बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत नव्हे रणसंग्राम रंगला आहे. शिवसेनेतील महा बंडाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही लढत वरकरणी उमेदवारामध्ये आहे. मात्र अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष व वर्चस्वाची लढत आहे. यामुळे बुलढाणा मतदारसंघातील लढत ‘हाय व्होल्टेज’ संग्राम ठरला आहे. बुलढाण्याच्या निकालाचे पडसाद केवळ जिल्हाच नव्हे तर, ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ पर्यंत उमटणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेत पडलेली उभी फूट, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा अन देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मिळालेले मुख्यमंत्री पद या ठाकरेंच्या जिव्हारी लागलेल्या व कायम भळभळणाऱ्या जखमा ठरल्या. या बंडाला बुलढाणा जिल्ह्यातून मोठी कुमक मिळाली. खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमदारद्वय संजय रायमूलकर व संजय गायकवाड हे मुंबई, सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले. सलग तीनदा आमदार झालेले रायमूलकर आणि प्रथमच आमदार झालेले गायकवाड हे बंडाळीत शामिल झाले. यानंतर सलग तीनदा खासदार झालेले प्रतापराव जाधव दिल्लीत पुढाकार घेत शिंदे गोटात सामील झाले.

हेही वाचा…वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

सिंदखेडराजा चे माजी आमदार शशिकांत खेडेकर, काही पदाधिकारी देखील शिंदे सेनेत गेले. जिल्हा सेनेत देखील फूट पडली. मात्र बहुसंख्य पदाधिकारी, शिवसैनिक ठाकरे सेनेत राहिले. त्यांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्यांनी ठाकरे सेना टिकवून ठेवली. बुलढाणा मतदारसंघात शिंदे सेनेने ठाकरे गटाच्या कार्यक्रमात राडा केला, मोताळ्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे ठाकरे गट एकवटल्याचे दिसून आले. त्यांना पाठबळ देण्याचे काम वरून करण्यात आले.

फुटीपासूनच बुलढाणा लक्ष्य!

या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ने बंडखोरांचे तळ असलेल्या बुलढाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघाना फार पूर्वीपासून डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना केली. बंडाळी नंतरच्या उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात देखील बुलढाण्याचा समावेश होता. त्यापाठोपाठ युवराज आदित्य ठाकरे यांनी जिल्हा दौरा केला. फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे दौरे झाले. शेजारील जिल्ह्यातील अंबादास दानवे बुलढाण्याकडे लक्ष ठेवून होते. नेते अरविंद सावंत यांनी नंतर बुलढाण्याची धुरा सांभाळली. अलीकडे मुंबईचेच राहुल चव्हाण पंधराएक दिवस जिल्ह्यात तळ ठोकून राहिले. यामुळे ठाकरे गट बुलढाण्यासाठी किती संवेदनशील आणि विजयासाठी किती आग्रही आहे हे स्पष्ट होते. दीडेक वर्षाच्या काळात गद्धारी, बंडखोरी,मतदारसंघाचा अविकसितपणा यावर जोर देऊन खासदार जाधव यांना जाणीवपूर्वक’ लक्ष्य’ करण्यात आले.

हेही वाचा…भंडारा : चरण वाघमारे पुन्हा ठरणार गेमचेंजर! पाठिंबा कोणाला?

जागा वाटपात प्रारंभीच मित्रपक्षांना बुलढाणा आम्हाला(च) लावेल अशी स्पष्ट कल्पना देण्यात आली. यामुळे बुलढाण्यावर काँग्रेसने नाममात्र दावा केला तर राष्ट्रवादी(शरद पवार )ने अजिबात दावा केला नाही. मित्र पक्षातील जयश्री शेळके, रेखा खेडेकर यांनी प्रसंगी हातात ‘मशाल’घेण्याची दर्शविली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी टोकाचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी अगोदरच जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचे नाव पक्के केले होते. यामुळे तीन सक्षम पर्याय उपलब्ध असतानाही ठाकरेंनी निष्ठेला कौल दिला. यात त्यांनी मोठा राजकीय धोका पत्करला. मात्र मुळात, निष्ठा विरुद्ध बंडखोरी, गद्धार विरुद्ध खुद्धार, असे लढतीचे चित्र करून लढण्याची मातोश्री’ ची रणनीती आहे. भाजपसारखे सर्वेक्षण अहवाल चा बाऊ करण्याचे टाळले.

नामांकन निमित्त आयोजित सभेला आदित्य ठाकरे, दानवे, अंधारे यांना पाठविण्यात आले.रोहित पवारांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या एका गटाची नाराजी लगेच दूर करण्यात आली. याशिवाय उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांच्या प्रचार सभा लावण्यात आल्या आहे. यामुळे ठाकरे सेना बुलढाण्यातील विजयासाठी किती पेटली आहे, हे समजते.

हेही वाचा…चंद्रपूर: शिवानी वडेट्टीवार काँग्रेस उमेदवार धानोरकरांच्या प्रचारापासून दूर

शिंदे गटाचे तुल्यबळ नियोजन

दुसरीकडे बुलढाणा व येथील विजय शिंदे गट किंबहुना थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची बाब ठरली आहे. भाजपा अंतिम टप्प्यापर्यंत बुलढाणा साठी आग्रही होती. त्यांनी दिल्लीपर्यंत कथित सर्वेक्षण चा मुद्दा रेटला. मात्र शिंदे दवाबतही बुलढाणा व खासदार जाधव यांच्यासाठी ठाम राहिले. नामांकनच्या पहिल्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरून भाजपावरील दवाब वाढविला. त्याला ‘वरून’ संमती होती. त्याच दिवशी संध्याकाळी जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली.

हेही वाचा…खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी

त्यांच्या नामांकन निमित्त महायुतीने फायर ब्रँड नेते गुलाब पाटील यांना पाचारण करण्यात आले. युतीचे चार आमदार, पदाधिकारी असा लवाजमा जमवून शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. राजकारण व निवडणूक लढविण्याचा दीर्घ अनुभव, खासदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या मुरब्बी राजकारणी असलेल्या जाधवांना यंदाही विजयाची’गॅरंटी’ आहे. राजेंद्र शिंगणेसारख्या नेत्याला दोनदा लोळविल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असणे स्वाभाविक आहे. आता तर शिंगणेच सोबत असल्याने त्यात भरच पडली आहे. त्यांनी निवडणूक चे जय्यत नियोजन केले आहे. यावर ‘वर्षा’ ची करडी नजर आहे. शिवसेना निवडणूक आयोग, न्यायालय मध्येच आपली नाही, तर जनतेच्या दरबारात सुद्धा आपलीच आहे, तीच ‘ओरिजनल’ असल्याचे शिंदेंना सिद्ध करायचे आहे. त्यामुळे राज्यातील धामधुमीतही मुख्यमंत्री बुलढाण्यावर नजर ठेवून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana lok sabha seat fight going to eknath shinde vs uddhav thackeray as both shivsena prepare strongly doing strategies scm 61 psg