नागपूर :नागपूरमध्ये गुरुवारी झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर अंतरवाली सराटीतील दोन वर्षापूर्वीच्या बैठकीचा संदर्भ घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यावेळी तेथे झालेल्या लाठीहल्ल्यामागे पवार यांच्या आमदारांचा हात होता, असे भुजबळ म्हणाले होते. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबीर शुक्रवारपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते व मंत्री नागपुरात दाखल झाले आहे. गुरुवारी सकाळी छगन भुजबळ नागपुरात आले. दुपारी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर समता परिषदेचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार)नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले होते. तेथे पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. त्यावेळी तेथे शरद पवार यांचे दोन आमदार उपस्थित होते, असा आरोप भुजबळ यांनी केला.

दरम्यान चिंतन शिबीराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री नागपूरमध्ये दाखल झाले. विमानतळावर पत्रकारांनी पवार यांना भुजबळ यांच्या आरोपासंदर्भात विचारले असता ते म्हणाले “ छगन भुजबळ यांनी काय गौप्यस्फोट केला त्याबद्दल मला माहिती नाही.. त्यांची त्या पाठीमागची काय भूमिका आहे याबाबतची अधिकची माहिती नाही, मी त्यांच्याशी उद्या बोलल्यावर कळेल…”

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शऱ्द पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टीकेबाबत पवार म्हणाले आमचं महायुतीचा सरकार आहे भाजपच्या प्रतिनिधी काही चुकिच बोलत असेल तर त्याची दखल भाजपने घेतली पाहिजे… पडळकर काय बोलले याबद्दल मला माहिती नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचा असला तरी महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आहे.. सुसंस्कृतपणा राजकारणात दाखवला गेला पाहिजे… बोलताना वागताना, वेदना देणारे वक्तव्य करू नये… समाजात सलोखा राहील आणि वातावरण चांगला राहील असे प्रयत्न करावे, असे अजित पवार म्हणाले