अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपमधील काही नेत्यांसोबत छुपा संबंध आहे. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी आम्हाला थेट कळवल्यामुळे अध्यक्षांना किती महत्त्व आहे, हे देखील कळले. त्याचे दु:ख पटोलेंना झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोल्यात रविवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले यांनी नितीन गडकरींना पाडण्यासाठी वंचितने पाठिंबा दिल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खरपूस समाचार घेऊन ॲड. आंबेडकर यांनी पटोलेंवर शरसंधान साधले. ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘सात जागेच्या पाठिंब्याचे पत्र काँग्रेसला दिले. त्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूर आणि नागपूरला पाठिंबा देण्याचे कळवल्यावर दोन्ही ठिकाणी पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा…बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

काँग्रेसचा उमेदवार जिंकणार म्हणून पटोले यांना प्रचंड दु:ख झाले. वंचितने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, तो गडकरींना हरवण्यासाठी दिल्याचा आरोप पटोलेंनी केला. पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले. काँग्रेसने भंडारा-गोदिंयातून लढण्यासाठी सांगितल्यावर पटोलेंनी यातूनच माघार घेतली. त्याचे खरे कारण आज कळले. त्यांना भाजपविरोधात लढायचे नाही.

काँग्रेसमधील काही नेत्यांचा भाजप नेत्यांसोबतचा छुपा संबंध आज समोर आला. प्रदेशाध्यक्ष असूनही आपला उमेदवार जिंकण्यापेक्षा गडकरी हरतील याचे दु:ख त्यांना झाले. आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून पाठिंबा दिल्याचा खोटा आरोप ते करीत आहेत. काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षांवर किती विश्वास आहे, हे दिसून आले. त्यामुळे वरिष्ठांनी आम्हाला थेट कळवले व आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे पाठिंबा जाहीर केला. त्याचे दु:ख पटोलेंना झाले म्हणून ते आता वंचितवर टीका करीत आहे. त्यांचे आणि भाजपचे नाते चव्हाट्यावर आले आहे, एवढेच सर्वसामान्यांनी लक्षात घ्यावे.’ वंचित ‘मविआ’मध्ये गेली असती तर भाजपचे अनेक नेते हरले असते. ते पटोलेंना नको होते म्हणून त्यांनी वंचितचा ‘मविआ’मध्ये समावेश होऊ दिला नाही, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा…नवनीत राणांच्‍या पत्रकांवर छायाचित्र नको, संजय खोडकेंचा विरोध; महायुतीत कुरबुरी

नांदेडचा उमेदवार अशोक चव्हाणांच्या सांगण्यावरून

नांदेड येथील काँग्रेसचा उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही. पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून उमेदवार दिला, असा आरोप देखील ॲड. आंबेडकर यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar alleges secret relationship between nana patole and bjp leaders ppd 88 psg