जळगाव – राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा तीव्र निषेध केला. विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी पडळकर यांच्या प्रतिमेला शाई फासून चपलांचा मार दिला.

विधिमंडळ अधिवेशनात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता पडळकर यांनी स्वतः माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त आणि अश्लाघ्य विधान केल्याचे उघडकीस आले आहे. ज्याचे राजकीय पडसाद उमटत संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार पडळकर यांना समज दिली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध ठिकाणी निषेध नोंदवून आंदोलने, निदर्शने करण्यात आली आहेत. पोलिसांकडे निवेदने सादर करून पडळकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे वडील दिवंगत नेते राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख करत अश्लाघ्य विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विशेषतः सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, पडळकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जात आहे. तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजकीय संस्कृती जपायला हवी, असा टोला हाणला आहे.

जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवार गटाने केलेल्या तीव्र आंदोलनामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैयक्तिक पातळीवरील अशा प्रकारच्या टीका महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणाऱ्या नाहीत, अशी प्रतिक्रिया पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जळगावमध्येही आमदार पडळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, सरचिटणीस वाय. एस. महाजन, जळगाव महानगर अध्यक्ष एजाज मलिक, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, महिला आघाडी महानगर अध्यक्षा मंगला पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, युवक शहर अध्यक्ष रिकू चौधरी, शोभा सोनवणे, माजी नगरसेवक सुनील माळी, राजीव मोरे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गौरव वाणी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.