नाशिक – नाशिकपासून त्र्यंबकेश्वर रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्यालगत असलेले बांधकाम नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून हटविण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला परिसरातील नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांवर आणि शेतीलगतची बांधकामे या मोहिमेत उदध्वस्त करण्यात येणार असल्याने पिंपळगाव बहुलाजवळ शेतकऱ्यांनी या मोहिमेस विरोधासाठी आंदोलन केले. दुसरीकडे आंदोलनास अजित पवार गटाचे आ. हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दर्शवत शासनाला घरचा आहेर दिला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबक रस्त्याचे रुंदी करण करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून त्र्यंबक रस्त्या लगतचे बांधकाम हटविण्यात येणार आहे. या कारवाईबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत प्रशासनविरोधी घोषणाबाजी केली.

सकाळी महापालिका हद्दीलगत पिंपळगाव बहुला येथून त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी फाट्यापर्यंत रस्त्यालगतचे बांधकाम हटाव मोहीम सुरू करण्यात आली. मागील ४० वर्षाहून अधिक काळापासून रस्त्यालगत घरे, दुकाने, जनावरांचे गोठे आदी बांधकाम आहे. ग्राम पंचायत हद्दीतील या घरांना परवानगी आहे. मात्र आता ती रस्ता रुंदी करणात अडथळा ठरत असल्याने प्राधिकरणकडून काढण्यात येणार आहे.

याबाबत स्थानिकांनी आपली भूमिका मांडली. विकास कामांना विरोध नाही. परंतु, आमच्या घरांवर अन्यायकारक पध्दतीने कारवाई होत असेल तर ती मान्य नाही. आमच्या नावावर सातबारा, सर्व मालकी कागदपत्रे असतांना शासन बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

आंदोलनामुळे त्र्यंबक रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. पोलीसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांशी संवाद साधला. प्रशासनाच्या वतीनेही विकास कामे नियमानुसार करत शेतकर्‍यांच्या अडचणींवर पर्याय शोधले जातील, असे आश्वासन दिले. दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार सरोज अहिरे, माकप नेते तानाजी जायभावे, सीमा घुगे आदींनी रस्त्यावर ठिय्या दिला. काहींनी याविषयी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही.

या विषयी बोलतांना आमदार हिरामण खोसकर यांनी सांगीतले, या प्रश्नांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. मात्र अधिकारी ऐकत नाही. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या सणाचे दिवस असतांना कोणाच्या घराला हात लावू नका. मात्र शासन ऐकत नाही. आम्ही सहकार्य करण्यात तयार आहोत तुम्ही रस्त्यालगत असलेले झाडे काढा. पण अधिकारी मंत्र्यांचेही ऐकण्यास तयार नाही. शासन चुकीचे करत असल्याची टीका आमदार खोसकर यांनी केली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यालगत असलेल्या बांधकामांचा अडथळा असून ही बांधकामे हटवण्यात येणार आहेत. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या या कारवाईला परिसरातील शेतकर्‍यांचा विरोध आहे.