बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात घडामोडींनी मंगळवारी नवं वळण घेतलं. या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यापासून मुंडेंच्या अडचणी वाढत गेल्या. वाल्मिक कराडबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंडेंनी आपला राजीनामा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हेंबरमध्ये स्थापन झालेल्या नव्या महायुतीचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. याची सुरूवात नव्याने होण्यासाठी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंडेंची भूमिका आधीपेक्षाही अस्थिर
डिसेंबर २०२४मध्ये बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी वाल्मिक कराड या मुंडेंच्या जवळच्या सहकाऱ्याचे नाव समोर आले. कराडचे नाव समोर आल्यापासून आणि या दोघांचा फोटो व्हायरल झाल्यापासून मुंडेंना अनेक वादांना तोंड द्यावे लागत होते. कराड याच्यावर वीज कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याच प्रकरणात त्याचा संतोष देशमुखांशी वाद झाला होता आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

अनेक दिवसांनंतर या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोपपत्र दाखल करण्यात आले, त्यानंतर मुंडेंवर दबाव आणखी वाढला. राष्ट्रवादीच्या नेत्याचा या हत्येशी थेट संबंध नसला तरी बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला आहे आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं म्हणत विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं.

काल देशमुख यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचा कसा छळ करण्यात आला याचे अनेक कथित फोटो माध्यमांकडून दाखवण्यात आले.ज्यामुळे मुंडे विरोधाला बळकटी मिळाली.

सत्ताधारी आघाडीत पक्षाची बळकटी पाहता राष्ट्रवादी पक्ष मुंडेंच्या बाजूने कितपत ताकद बाळगू शकेल याबाबत शंका होतीच. मुंडे यांनी राजनामा दिल्यामुळे महायुती सरकारच्या अडचणी बहुतांश प्रमाणात कमी झाल्या आहेत, शिवाय विरोधी पक्षाला गदारोळ माजवण्यासाठीचा एक मुद्दा हातून काढून घेतला आहे.

मुंडेंचं प्रकरण बाजूला सारत असतानाच राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्‍यांचे प्रकरण समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांना फ्लॅट खरेदी करण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोकाटे यांनी या शिक्षेविरूद्ध याचिकाही दाखल केली आहे.

मुंडे यांचा हा पहिलाच वाद नव्हता
दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, धनंजय मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत बलात्काराचे आरोप तसंच अनेक वैयक्तिक आरोपही त्यांच्यावर झाले. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले. २०१३मध्ये, मुंडेंनी भाजपाचा राजीनामा दिला आणि २०१४मध्ये विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीमधून लढवली. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना पराभूत केलं. पाच वर्षानंतर धनंजय मुंडे या जागी निवडून आले. त्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीनंतर परळीची जागा ते १.४ लाख मतांनी जिंकले.

जातीय वाद
देशमुख प्रकरणात एक मुद्दा समोर आला तो महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरूद्ध अमराठा यांच्यातील वाढती दरी. देशमुख हे मराठा होते. त्यांच्या हत्येमध्ये जे आरोपी होते ते मुंडेंच्या वंजारी समुदायाशी संबंधित होती. बीड हा मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला असला तरी मराठा समाजाचा या भागात बऱ्यापैकी राजकीय प्रभाव आहे. या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवणारे सुरेश धस हे एक प्रमुख मराठा नेते आहेत.

मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब
नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रि‍पदाची धुरा पुन्हा एकदा हाती घेताना भ्रष्टाचार, गुन्हेगारीविरोधी पारदर्शक सरकार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुंडे जितका वेळ मंत्रिमंडळात राहिले ते फडणवीसांसाठी अडचण ठरले. अलिकडेच स्वारगेट प्रकरणावरून तर त्याआधी सैफ अली खानवरील हल्ल्यामुळेही महायुती सरकारवर टीका झाली होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून दोन महिन्यांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा मागायला हवा होता असा युक्तिवाद भाजपाच्या काही नेत्यांनी केला. “जर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचे आरोप सिद्ध करणारे पुरावे असतील तर मंत्र्‍यांवर कारवाई केली जाईलच. कोणीही कितीही शक्तिशाली असला तरी सुटणार नाही”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“फडणवीस आणि अजित पवार यांना देशमुख प्रकरणाची पूर्ण माहिती होती. माझा प्रश्न असा आहे गुन्ह्याची तीव्रता पाहता ते अस्वस्थ का झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या विवेकाला धक्का बसला नाही का, आज विरोधी पक्षाच्या दबावामुळे त्यांनी मुंडेंचा राजीनामा मागितला, पण इतक्या दिवसांपासून एखाद्या गुन्हेगाराशी मंत्र्‍यांचे संबंध असणं कसं काय समर्थनीय असू शकतं”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून निर्णय घेतला असता तर आम्ही कौतुकच केलं असतं. पण हे विचार करून उचललेलं पाऊल आहे. विरोधी पक्ष आणि जनतेपुढे हात टेकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.
एका उच्च पदावरील सूत्राने सांगितले की,”जेव्हा सरपंच हत्येचे फोटो सोशल मीडियावर समोर आले तेव्हा कठोर कारवाईची आवश्यकता होतीच यात काही शंका नव्हती.”

पंकजा मुंडे यांनी चुलत भावाच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाची बाजू घेतली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना पंकजा म्हणाल्या, “मी राजीनाम्याचे स्वागतच करते. त्यांनी हे आधीच करायला हवं होतं. या सगळ्यातून त्यांना बऱ्यापैकी सन्माननीय मार्ग सापडला असता पण राजीनामा न देण्यापेक्षा उशिरा दिलेला बरा”. जेव्हा आपण एखादं पद स्वीकारतो तेव्हा राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा समान विचार केला पाहिजे. देशमुख कुटुंबाच्या वेदना आणि दु:खाच्या तुलनेत राजीनामा देण्याचा निर्णय हा काहीच नाहीये असंही पुढे पंकजा म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde resignation only option mahayuti hsp