पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली. काही ठिकाणी महायुतीमध्ये फूट, तर आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार असून, अर्ज माघारीसाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

बारामतीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आमने-सामने ; भाजपला ‘रासप’ची साथ

बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आमने-सामने उतरले आहेत. दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे करण्यात आले असल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजपला राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) साथ दिली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षानेही उमेदवार उभे केल्याने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबरच महायुतीतील मित्रपक्षांशी लढत द्यावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने तीन जणांचे अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीनंतर या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित होणार असल्याचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

बारामती नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. सचिन सातव यांनी यापूर्वी बारामती नगरपरिषदेचे गटनेते म्हणून काम पाहिले आहे. भाजपकडून ३२ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाची साथ घेतली असून, त्यांचे चार उमेदवार असणार आहेत. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी ॲड गोविंद देवकाते यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. त्यामध्ये विचार करून निर्णय घेणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.

बसपाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी काळूराम चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जेजुरीत भाजपचेस र्व प्रभागांमध्ये उमेदवार

जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत यापूर्वी भाजपला उमेदवारही मिळत नव्हता. मात्र, माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी ४२ अर्ज दाखल झाले आहेत.

नगराध्यक्षपदी राहिलेले जेष्ठ नेते दिलीप बारभाई हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांचे चिरंजीव जयदीप बारभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उभे राहिले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपतर्फे गेली ५ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या वीणा सोनावणे यांचे दीर सचिन रमेश सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

माजी आमदार संजय जगताप यांच्या ताब्यात यापूर्वी नगरपालिका होती. जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जेजुरी नगरपरिषदेतील समीकरणे बदलली आहेत. यापूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कधीच भाजपला सर्व प्रभागांत उमेदवार उभे करता आले नव्हते, मात्र आता सर्व ठिकाणी उमेदवार भाजपचे उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेना( शिंदे) पक्षाच्या वतीने जेजुरी शहर प्रमुख दिनेश दिलीप सोनवणे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. अजित पवार आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यात सासवड ,जेजुरी, फुरसुंगी या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी वाटाघाटी सुरू आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दौंडमध्ये तिरंगी लढत

दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत नागरिक संरक्षण मंडळ आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि त्यांचे आघाडीतील मित्रपक्ष यांच्यात तिरंगी सामना होत आहे. या निवडणुकीत प्रेमसुख कटारिया यांच्या नागरिक संरक्षण मंडळ आणि भाजपचे आमदार राहुल कुल एकत्र असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार रमेश थोरात आणि दौंड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्ष यांचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असून, या पॅनलचे नेतृत्व अप्पासाहेब पवार यांच्याकडे आहे.

दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पडद्याआडून दौंडचे आजी-माजी आमदार आपल्या पुढील राजकीय समीकरणाची जुळवाजुळवीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली आहे.

इंदापूरमध्ये अजित पवारांना जिल्हाध्यक्षांचे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले आहे. राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्याशी गारटकर यांनी हातमिळवणी केली असून, ‘कृष्णा–भीमा विकास आघाडी’च्या वतीने गारटकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

इंदापूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गारटकर आणि शहा यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, गारटकर आणि प्रवीण माने हे तिघे एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. शहा यांच्या उमेदवारीला गारटकर यांनी विरोध केला असून, पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शहा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासाठी १० जणांनी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवकपदासाठी ९० अर्ज आले आहेत.

दरम्यान, प्रभागरचनेतील बदलामुळे नगरसेवकांची संख्या तीनने वाढणार आहे. मतदारसंख्या पंचवीस हजारांवर गेल्याने निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.

राजगुरूनगर नगर परिषदेत आघाडीत बिघाडी

राजगुरूनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती झाली असून, २१ पैकी भाजपने १३ जागा मिळविल्या आहेत. महाविकास आघाडीत मात्र फूट पडली आहे.

महाविकास आघाडीने सर्वपक्षीय उमेदवार म्हणून किरण आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आघाडीपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यमान आमदार बाबाजी काळे यांना महाविकास आघाडीकडून नगरसेवकपदासाठी एकही अधिकृत उमेदवार उभा करता आला नाही. त्यांचे एकमेव उमेदवार बापू थिगळे हे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत.

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप यांच्यात युती होऊन भाजपला १३ जागा देण्यात आल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भव्य रॅली काढत भाजपच्या १३ नगरसेवकांचे अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी ११ जणांनी, तर २१ नगरसेवकपदांच्या जागांसाठी १३६ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवाजी मांदळे, मंगेश गुंडाळ, दीपक थिगळे, गणेशकुमार इंगवले यांनीही अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्जाची छाननी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.

शिरूरमध्ये महायुती स्वबळावर, आघाडी एकत्र

शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने मित्रपक्षांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ), शिवसेना आणि काँग्रेस महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवित आहेत.

शिरूरचे राजकारण हे धारिवाल कुटुंबामध्ये केंद्रित होते. यंदाच्या निवडणुकीत उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या आघाडीतील इच्छुक उमेदवारांना अन्य पक्षांतून उमेदवारी मिळवावी लागली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनीही निवडणूक लढविण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इच्छुकांची अडचण झाली.

शिरूर शहर विकास आघाडीच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी नगरसेविका रोहिनी बनकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका पूजा जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढविणार आहेत. मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनीही मनसेची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून अलका खांडरे, भाजपकडून सुवर्णा लोळगे, राष्ट्रवादी काँग्रेेस (अजित पवार) पक्षाकडून ऐश्वर्या पाचर्णे, शिवसेना (शिंदे) पक्षाकडून रोहिणी बनकर तसेच माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मंचरमध्ये सर्व पक्षांचे उमेदवार

मंचर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होऊ शकली नसल्याने सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून मोनिका सुनील बाणखेले, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने राजश्री दत्तात्रय गांजाळे, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने रंजनिगंधा राजाराम बाणखेले, काँग्रेसने फरजीन इकबाल मुलाणी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे नेते संजय थोरात यांच्या स्नूषा प्राची आकाश थोरात आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जागृती महाजन यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी नऊ आणि नगरसेवक पदासाठी ११४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

जुन्नर नगर परिषदेत महायुतीत बिघाड

जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने स्वतंत्र २० उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला. शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांनी एकत्रित लढण्याचे जाहीर केले. मात्र, काही प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित करताना एकमत न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत जाहीर केली.

शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांनी नगराध्यक्षपदासाठी सुजाता मधुकर काजळे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र शेवटच्या क्षणी भाजपच्या तृप्ती वैभव परदेशी यांनी उमेदवारीअर्ज दाखल करत युतीला धक्का दिला. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आघाडी जाहीर केली. मात्र, त्यांना सर्व ठिकाणी उमेदवार देता आलेले नाहीत.

दरम्यान, या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी असलेल्या २० जागांसाठी ६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाने काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना ( शिंदे ) आणि भाजपच्या वतीने माजी शिवसेना गटनेते मधुकर काजळे यांची पत्नी सुजाता काजळे यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष धनराज खोत यांच्या स्नुषा स्नेहल खोत यांनी, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने गौरी शेटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या वतीने राहीन इसाकखान कागदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली असली, तरी काही ठिकाणी शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्या उमेदवारामध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहे.

भोरमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच चुरस

भोर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांनीही उमेदवार उभे केल्याने महायुतीतील मित्रपक्षांमध्ये चुरस असणार आहे.

भोर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.नगराध्यक्षपदासाठी संजय दत्तात्रय जगताप (भाजप), रामचंद्र श्रीपती आवारे (राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)), नितीन सोनावले, शिवसेना (शिंदे) यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच १० प्रभागांतील २० जागांसाठी १२३ अर्ज आले आहेत.

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनीही त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावलेली आहे. याशिवाय येथे शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची ताकद असल्याने त्यांचेही उमेदवार रिंगणामध्ये आहेत.

सासवडमध्ये चौरंगी सामना

सासवड नगर परिषदेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी होऊ शकली नसल्याने सर्व पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार संजय जगताप यांनी नगराध्यक्षपदासाठी आपापले उमेदवार उभे केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार असल्याने या नगर परिषदेत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जगताप यांच्या मातोश्री आनंदी जगताप यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार योगेश टिळेकर, संजय जगताप, भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप, साकेत जगताप, गिरीश जगताप, राजवर्धिनी जगताप, मुन्ना शिंदे, संतोष गिरमे, माऊली गिरमे आदी उपस्थित होते.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पुरंदर तालुकाप्रमुख अभिजित जगताप यांनी उमेदवारीअर्ज दाखल केला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे माजी नगरसेवक सचिन सुरेश भोंगळे यांनी अर्ज भरला आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे ते उमेदवार आहेत. माजी नगरसेवक वामन जगताप यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

माळेगाव नगरपंचायतीत अजित पवार-तावरे यांच्यात युती

बारामती नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप नेते रंजन तावरे यांची जनमत विकास आघाडी यांच्यात युती झाली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि तावरे यांंच्यात कटुता निर्माण झाली होती. ही कटुता दूर होऊन त्यांच्यात मैत्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’कडून सुयोग सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कट्टर विरोधक असलेले रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर समझोता केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्ष पदासह १०, तर जनमत विकास आघाडी ७ जागांवर एकत्र निवडणूक लढविणार आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी दहा, नगरसेवक पदासाठी ११० उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला सोरटे यांनी सांगितले.

चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेनेची युती; दिवंगत आमदार सुरेश गोरे यांची पत्नी उमेदवार

चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांची युती झाली आहे. शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांची पत्नी मनीषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. त्यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची विभागणी झाली असली, तरी गोरे कुटुंबाचे पक्षासाठीचे योगदान, सहकार्य आणि सहानुभूती पाहून पाठिंबा दिल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.

चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ प्रभाग असून, २५ नगरसेवक आहेत. एका प्रभागातून तीन आणि ११ प्रभागांतून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. येथे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही प्रमुख पक्षांत लढत होण्याची चिन्हे असतानाच दोन्ही शिवसेना नगराध्यक्षपदासाठी एकत्र आल्या आहेत. शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांची पत्नी मनीषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरल्या आहेत. मनीषा गोरे यांचा उमेदवारीअर्ज दाखल करताना शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक आमदार बाबाजी काळे, शिवसेनेचे (शिंदे) जुन्नरचे सहयोगी आमदार शरद सोनावणे उपस्थित होते. दोन्ही शिवसेनेचे तालुक्यातील नेतेही उपस्थित होते.

याबाबत आमदार बाबाजी काळे म्हणाले, की सुरेश गोरे हे २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार होते. करोना काळात त्यांचे निधन झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खेड तालुक्यातील काही जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. सुरेश गोरे यांनी तालुक्याचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शानातून आम्ही घडलो. गोरे कुटुंबासह शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत मला सहकार्य केले. सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून मनीषा गोरे यांना निवडून आणावे, असे आम्ही ठरवले आहे. शिवसेनेची विभागणी झाली असली, तरी गोरे कुटुंबाचे योगदान पाहून नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाचा उमेदवार उभा केला जाणार नाही.’

‘केवळ नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. तालुकास्तरावर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे याला युती म्हणता येणार नाही. सदस्य पदासाठी शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार उभे आहेत,’ असे काळे यांनी स्पष्ट केले.

खेड तालुक्यात दोन्ही शिवसेना सुरुवातीपासून एकत्रच आहेत. आमदार बाबाजी काळे हे सोयीनुसार भूमिका घेतात. शिवसेनेत (ठाकरे) निष्ठावंत शिवसैनिक आणि दुसऱ्या पक्षातून आलेले असे दोन मतप्रवाह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष चाकण, आळंदी, खेड या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. – दिलीप मोहिते, माजी आमदार