डोंबिवली : पनवेल – डहाणु मेमु शटल भिवंडी रोड रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री अर्धा तासाहून अधिक काळ रोखून धरणाऱ्या ६८ प्रवाशांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानाने मंंगळवारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही मेमु गाडी नेहमीच उशिरा धावते. लांब पल्ल्याच्या गाड्या या गाडीच्या पुढे काढल्या जातात, असे आरोप आंदोलनकर्त्या प्रवाशांकडून करण्यात येत होते.
रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी आंदोलनकर्त्या प्रवाशांना आपण आपले म्हणणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांना सांगा. त्यांच्या तक्रारी नोंदीत तक्रार करा, असे सांगून रेल्वे रूळातून प्रवाशांंना बाजुला होण्यास सांगत होते. पण प्रवासी बाजुला हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी प्रवाशांंविरुध्द गुन्हा दाखल केला.
पनवेल-डहाणु मेमु शटल गाडीने पनवेल, डहाणु, वसई, विरार भागातील प्रवासी प्रवास करतात. डहाणु, पालघर, बोईसर भागातील अनेक भागातील नोकरदार ठाणे, भिवंडी, पनवेल भागात नोकरीसाठी या गाडीने येतात. पनवेल-डहाणु मेमू लोकल पनवेल येथून मंगळवारी संध्याकाळी सुटली.
भिवंडी रोड रेल्वे स्थानकात ही गाडी ८.०५ वाजता येणे अपेक्षित होते. ही गाडी भिवंडी रेल्वे स्थानकात रात्री ९.०८ वाजता आली. गाडी एक तास उशिरा आल्याने प्रवाशांच्या संतापाच उद्रेक झाला. ही गाडी पनवेलहून सुटल्यावर या गाडीच्या अगोदर लांब पल्ल्याच्या गाड्या काढल्या जातात. ही गाडी बाजुला उभी केली जाते. त्यामुळे या गाडीला डहाणु येथे जाण्यास नेहमी विलंब होतो, असे आरोप करत प्रवाशांना पनवेल डहाणु मेमू शटल समोर ठिय्या मांडला.
रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी प्रवाशांना रेल्वे मार्गातून हटविण्याचा प्रयत्न केला. ते हटण्यास तयार नव्हते. आपण आपले म्हणणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांना सांगा असे सांगुनही प्रवासी ऐकत नव्हते. ६० पुरूष सात महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ही गाडी उशिरा धावत असल्याने आम्हाला नेहमीच घरी जाण्यास उशीर होतो. आमची घरे रेल्वे स्थानकापासून खेडेगावात आहेत. त्यामुळे बस, खासगी वाहने निघून गेलेली असतात, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या.
अखेर रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांच्या यशस्वी प्रयत्नानंतर रेल्वे मार्गातून प्रवासी रात्री ९.४५ वाजता बाजुला झाले. प्रवासी बाजुला झाल्यानंतर पनवेल डहाणू मेमू शटल डहाणुच्या दिशेने रवाना झाली. प्रवाशांनी अडथळा आणल्याने डहाणू शटल अर्धा तास भिवंडी रोड रेल्वे स्थानकात खोळंबली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी आंदोलनकर्त्या प्रवाशांविरुध्द डोंबिवली रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.