ठाणे : केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ‘राष्ट्रीय पोषण माह” साजरा केला जातो. यावर्षी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण माह जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात येणार आहे. यावर्षी लठ्ठपणा नियंत्रण, प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षण, एक पेड मां के नाम, बालक व लहान मुलांच्या आहार पद्धती आणि वोकल फॉर लोकल या संकल्पनांवर आधारित पोषण अभियान पार पडणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा, प्रकल्प आणि अंगणवाडी स्तरावर विविध कार्यक्रम राबविले जातील.

स्थानिक आहाराला प्रोत्साहन देणे, तृणधान्ययुक्त आहाराचे महत्त्व सांगणे, पोषण वाटिकांना संजीवनी देणे, स्थानिक शेतकऱ्यांसोबत संवाद साधणे, स्थानिक महिला कलाकारांना व्यासपीठ देणे तसेच स्थानिक खाद्यपदार्थ व वस्तूंच्या वापरास चालना देणे असा वोकल फॉर लोकल या संकल्पनेचा उद्देश आहे. या अभियानाचा प्रमुख हेतू बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हा असून बालकांच्या पहिल्या १००० दिवसांमध्ये योग्य पोषणाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात येणार आहे.

तसेच बालकांमधील लठ्ठपणा, प्रारंभिक शिक्षण आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीविषयी जनजागृती करणे हा देखील या मोहिमेचा भाग आहे. राष्ट्रीय पोषण माह २०२५ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून कुपोषणमुक्त ठाणे जिल्हा घडविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने सर्व नागरिक, अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक, ग्रामसेवक आणि स्थानिक संस्थांना करण्यात येत आहे.

“कुपोषणावर मात करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. पोषण माहाच्या माध्यमातून आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत योग्य आहार, योग्य जीवनशैली व योग्य माहिती पोहोचवून आरोग्यदायी समाजाची पायाभरणी करत आहोत. वोकल फॉर लोकल या संकल्पनेद्वारे आपण स्थानिक शेतकरी, स्थानिक आहार आणि स्थानिक परंपरा यांना बळकटी देऊन ‘सशक्त भारत – पोषित भारत’ घडवूया”. – रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.

“पोषण माह हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर लोकचळवळ आहे. जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळा व ग्रामपातळीवर उपक्रम राबवून एकही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करणे हे आपले उद्दिष्ट आहे. जनसहभाग व विभागीय अभिसरणाच्या माध्यमातून आपण ही मोहिम यशस्वी करू.” – संजय बागुल, प्रकल्प अधिकारी, महिला व बाल विकास विभाग.