शहापूर : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवोदय विद्यालय लवकरच शहापूर तालुक्यात उभारले जाणार आहे. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर माहीम येथील नवोदय विद्यालय पालघरमध्ये गेल्यामुळे शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, २०२४ अखेरीस शासनाने ठाणे जिल्ह्यात नवीन नवोदय विद्यालय स्थापनेला मंजुरी दिली. आता,या विद्यालय स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात प्रवेश मिळावा अशी प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांमधून अवघ्य़ा काही विद्यार्थ्यांना या विद्यालयात प्रवेश मिळतो. नवोदय विद्यालय संकल्पना ही ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी राबविण्यात येते. या विद्यालयात शिक्षण घेता यावे यासाठी दरवर्षी प्रत्येक जिल्यातून दहा हजार विद्यार्थी निवड चाचणी परीक्षा देतात. या परीक्षेत पहिल्या ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
पू्र्वी पालघर आणि ठाणे जिल्हा एकच होता. परंतू, आता पालघर जिल्हा स्वतंत्र होऊन इतके वर्षे उलटले तरी, नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पालघर आणि ठाणे जिल्ह्यात विभागून घेतली जाते. माहीम येथील नवोदय विद्यालय पालघरमध्ये गेल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण या तालुकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र नवोदय विद्यालयाची मागणी जिल्हा विभाजनानंतर वारंवार केली जात होती.
जिल्हा परिषदेतील ठराव, अर्जविनंत्या याद्वारे सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर २०२४ अखेरीस शासनाने ठाणे जिल्ह्यात नवीन नवोदय विद्यालय स्थापनेला मंजुरी दिली. आता, या विद्यालय उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या विद्यालयासाठी शहापुर तालुक्यातील भातसानगर येथील जलसंपदा विभागाचे तब्बल सहा हेक्टर क्षेत्र मंजुरीसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि सर्वांगीण शिक्षणाची संधी
सांस्कृतिक आणि मूल्यांवर आधारित शिक्षण समाविष्ट असलेल्या या नवोदय विद्यालयामुळे आता ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण प्राप्त होणार आहे. तसेच निवासी विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, जेवण्यासाठी आणि अभ्यासासाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. दर्जेदार शिक्षणासह या विद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास साधला जाणार आहे. शिक्षणासोबतच, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सहभाग घेण्याची संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचा चोहोबाजूंनी विकास होणार आहे.