ठाणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी चला गणपतीला म्हणत कोकणवासीयांना साद घातल्याचे दिसून येत आहे. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी नाव नोंदणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यामध्ये निवडणुकीस इच्छुक उमेदवार नोंदणीसाठी आग्रही असून शिवसेना शिंदे गट यामध्ये आघाडीवर आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली चढा ओढ येत्या काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात गणेशोत्सव, शिमगोत्सव, होळी हे सण पारंपारिक पद्धतीने साजरे होतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अधिक संख्येने राहतात. परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मुळ गावी परतत असतात. तसेच दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वे, एसटी आणि खासगी गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. यासाठी यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे आरक्षण निश्चित व्हावे यासाठी मागील महिन्यातच ठाणे रेल्वे स्थानकात दोन अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर राजकीय पक्षांनी ‘चला गणपतीला’ असा संदेश देत मोफत बस सेवेची घोषणा केली आहे.
शिवसेना (शिंदे गट) या उपक्रमात आघाडीवर असून ठाणे शहरातील विविध ठिकाणी मोठे फलक लावण्यात आले आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया! शिवसेनेसोबत गावी जाऊया’ अशा आशयाचे हे फलक आहेत. या सेवेसाठी नाव नोंदणीही सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, दापोली, खेड, महाड, पाली, माणगाव, देवरूख या प्रमुख कोकण मार्गांवर ही बससेवा सोडण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. अशावेळी निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे. या सेवेमागे सामाजिक बांधिलकी असल्याचे पक्ष पदाधिकारी सांगत असले तरी त्यामागे राजकीय गणित असल्याची चर्चा होत आहे. सध्या या सेवेसाठी शिवसेना शिंदे गट आघाडीवर असला, तरी लवकरच इतर राजकीय पक्षही यामध्ये उतरतील अशी चिन्हे आहेत.
गणेशोत्सवात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी शिवसेनेच्यावतीने मोफत बस सेवा केली जाणार आहे. यासाठी आगाऊ आरक्षणासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये सुरू झाली आहे. या मोफत बस सेवेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांचा वापर केला जाणार आहे. नाव नोंदणी झाल्यानंतर प्रवासी संख्येनुसार परिवहनाच्या गाड्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.