Mumbai Maharashtra News Live : लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमेकांवर दबाव वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. राज्याचे पावसाळी अधिवेशन २९ जून पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी २६ जून रोजी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडेल. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या ११ जागांच्या विधानपरिषदांची चुरस दिसून येईल.

Live Updates

Mumbai Maharashtra News | मुंबई आणि महाराष्ट्राशी निगडित बातम्या वाचा लाईव्ह

12:37 (IST) 25 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live : पुणे अमली पदार्थ प्रकरणात एका तरुणाला मुंबईतून अटक

पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. आता अमली पदार्थ सेवन करणाऱ्या एका तरुणाला मुंबईतून अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

12:34 (IST) 25 Jun 2024
राज्यात ६.८४ लाख क्विंटल ज्वारी खरेदी होणार; ‘पणन’च्या वाढीव उद्दिष्टाला…

अकोला : राज्यात पणन महासंघाकडून रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचे वाढीव सहा लाख ८४ हजार क्विंटलच्या उद्दिष्टाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 25 Jun 2024
डोंबिवलीत पती-पत्नीला तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न

डोंबिवली : रिअल इस्टेट व्यवसायातील एक महिला आणि तिच्या पतीला डोंबिवलीतील एका इसमाने तलवारीचा धाक दाखवून मारण्याचा प्रयत्न केला. या पती, पत्नीच्या बचावासाठी इतर नागरिक पुढे आले, त्यावेळी इसमाने मध्ये कोणी आले तर त्यांना तलवारीने मारून टाकीन अशी भाषा करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.

वाचा सविस्तर…

12:20 (IST) 25 Jun 2024
बुलढाणा : चहामुळे वाचले ४८ वऱ्हाड्यांचे प्राण; मेहकर फाट्यावर ट्रॅव्हल्स अचानक पेटली

बुलढाणा: विदर्भाच्या टोकावरील चंद्रपूर येथून वऱ्हाड घेऊन येणारी खाजगी बस अचानक पेटली खरी मात्र नशीब बलवत्तर म्हणून ४८ प्रवाश्यांचे (वऱ्हाड्यांचे) प्राण वाचले! प्राप्त माहितीनुसार हे सर्व नशीबवान वऱ्हाडी चहाची तल्लफ भागविण्यासाठी खाली उतरल्याने त्यांचे प्राण वाचले.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 25 Jun 2024
उत्‍तर रायगडात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

अलिबाग : एकीकडे दक्षिण रायगडमध्ये शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. उत्तर रायगड मधील शेतकरी मात्र चिंतातूर आहे. पावसाआभावी अनेक ठिकाणी भातरोपांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 25 Jun 2024
ब्रिटीशकालीन लष्कर न्यायालयाचे स्थलांतर

पुणे : ब्रिटीशकालीन लष्कर न्यायालयाची इमारत जीर्ण झाली असून, जागा अपुरी पडत आहे. लष्कर न्यायालयाचे स्थलांतर वानवडीतील पुणे महापालिकेच्या महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या आवारात करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 25 Jun 2024
केंद्रीय मंत्री मोहोळांच्या प्रयत्नांना यश! अखेर पुणे विमानतळाचा प्रलंबित प्रश्न मार्गी

पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या ऑबस्टॅकल लिमिटेशन सरफेसेस (ओएलएस) सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे धावपट्टी विस्ताराला गती मिळाली आहे.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 25 Jun 2024
नागपूर एम्समध्ये बायपास शस्त्रक्रिया ठप्प, भूलतज्ज्ञ सुट्टीवर…

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ज्ञ एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्याने पंधरा दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत. भूलतज्ज्ञाने एक महिन्यापूर्वी एम्स प्रशासनाकडे सुट्टीचा अर्ज केला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. परिणामी, पंधरा दिवसांपासून एम्समध्ये एकही बायपास शस्त्रक्रिया झाली नाही.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 25 Jun 2024
चंद्रपूर : आर्ली प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांचे इरई धरण परिसरात आगमन, विणीच्या हंगामासाठी पाच हजार किमीचा प्रवास

चंद्रपूर : पश्चिम ऑस्ट्रेलिया येथून पाच ते सहा हजार किलोमीटरचे अंतर पार करून आर्ली प्रजातीचे विदेशी पक्षी इरई धरण परिसरात दाखल झाले आहेत. हे पक्षी दरवर्षी येथे येत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. विणीसाठी हे पक्षी भारतात येतात, असे निरीक्षण प्राणिशास्त्र विभागाचे अभ्यासक शुभम संजय आत्राम यांनी नोंदवले आहे.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 25 Jun 2024
नागपूर : वाहतूक कोंडीने आयटी पार्क, अंबाझरी पुन्हा ‘जाम’! वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन सुस्त; नागरिक त्रस्त

नागपूर : अंबाझरी तलावातील पाणी वाहून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे अंबाझरी परिसरातून वळवलेल्या वाहनांमुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीवर पर्याय शोधण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांवर ते नाराजी व्यक्त करत आहेत.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 25 Jun 2024
मुंबई : रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय कारवाई केली ? तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ज्ञ समितीने शिफारशी केल्या होत्या. या समितीने रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही काही शिफारशी केल्या होत्या. त्यामुळे, रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय कारवाई केली ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित प्राधिकरणांना केला आहे.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 25 Jun 2024
मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मोसमी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज फोल ठरला. यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने दडी मारली असून मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 25 Jun 2024
Maharashtra Breaking News Live : कंगना रणौतला राष्ट्रपती भवनात ठेवावं; संजय राऊत यांचा टोला

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी महाराष्ट्र सदनातील मुख्यंमत्री कक्ष मागितला. त्यांची ही मागणी मुर्खपणाची आहे. नवीन खासदारांची त्या त्या राज्यातील सदनात व्यवस्था केली जाते. नियमाप्रमाणे त्यांची व्यवस्था हिमाचल प्रदेशच्या सदनात व्हायला हवी. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा कक्ष मागणे मुर्खपणाचे आहे. त्यांना तर राष्ट्रपती भवनात ठेवायला हवं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

10:52 (IST) 25 Jun 2024
ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी; दुचाकीस्वारांचा प्रवास धोकादायक

ठाणे : गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी करण्यात आलेल्या ठाणे, घोडबंदर आणि खारेगाव भागांतील महामार्गासह उड्डाणपुलांवर यंदा पहिल्याच पावसात मोठे खड्डे पडले. यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सविस्तर वाचा…

10:51 (IST) 25 Jun 2024
पिंपरी- चिंचवड: शरद पवार गटापाठोपाठ ठाकरे गटाने पिंपरीसाठी ठोकला शड्डू; पिंपरीतून शहराध्यक्ष भोसले इच्छुक

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी विधानसभेवर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी पिंपरीचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असा चंग बांधला असून पिंपरी विधानसभेवर दावा केला आहे. सचिन भोसले हे स्वतः पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

सविस्तर वाचा…

10:50 (IST) 25 Jun 2024
भटक्या श्वानाचा संशयास्पद मृत्यू, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : वागळे इस्टेट येथील मनोरुग्णालय भागात एका रहिवासी इमारतीच्या आवारात चार ते पाच महिन्यांच्या भटक्या श्वानाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. या श्वानाला विष प्राषण करुन किंवा बेदम मारहाण करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप प्राणी प्रेमी संघटनेने केला आहे.

सविस्तर वाचा…

10:50 (IST) 25 Jun 2024
रेल्वे वाचविणार वर्षाला ५२ लाख रुपये! विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘अपारंपरिक’ पर्याय

पुणे : अनेक सरकारी विभागांकडून इमारतीच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प सुरू करून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यातून विजेच्या खर्चात बचत होत आहे. आता मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घोरपडीतील डिझेल लोको शेडमध्ये छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून वर्षाला रेल्वेची वीज देयकात ५२ लाख रुपयांची बचत होणार आहे.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 25 Jun 2024
पिंपरी- चिंचवड: तुतारीचं काम करणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचं बैठकीत परखड मत..म्हणाले, लोकसभेत…!

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार गट आणि काँग्रेस विरोधात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर किंवा काँग्रेस ने उमेदवार दिल्यास त्यांच काम आम्ही करणार नाही.

सविस्तर वाचा…

10:22 (IST) 25 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live : अमित शाह एकनाथ शिंदे यांची दिल्लीत बैठक, जागावाटपावर काय ठरलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट उत्तम होता. तसेच यवतमाळ, हिंगोलीचे उमेदवार बदलण्याचा दबाव आणि नाशिकचा उमेदवार जाहिर करण्यात केलेला उशीर, याबाबतही शिंदे यांनी आपली बाजू मांडले असल्याचे सांगितले जाते. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळाव्यात, असा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे यावरून दिसते.

सूर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )