Shivsena Eknath Shinde Speech 2025: मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना फुटल्यापासून ते सातत्याने राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढतील, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आव्हान निर्माण होऊ शकते. यासह दसरा मेळाव्यातील एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या लाईव्ह अपडेट्स.
Eknath Shinde Dussehra Rally Goregaon NESCO Mumbai Live
बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्यांवर तुम्ही टीका करता: एकनाथ शिंदे
बाळासाहेबांचे राम मंदीर बांधण्याचे आणि ३७० कलम हटवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आणि त्यांच्यावरच तुम्ही टीका करत आहात. हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आरएसएसवरही तुम्ही टीका करता. जेव्हा जेव्हा संकटे येतात, तेव्हा ते धावून जातात. राष्ट्रभक्त आरएसएस वरही टीका करता. १००व्या वर्धापनदिनानिमित्त मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शुभेच्छा देतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचा भगवा फडकवायचा आहे: एकनाथ शिंदे
लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपल्याला विजय मिळवायचा आहे. अडीच वर्षात जे काम केले आहे ते लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समीती आणि ग्रामपंयतींमध्येही महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेने ८० जागा लढवून ५० जागेंवर विजय मिळवला आहे.
“मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही”, एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
कोणीही आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचीच राहणार आहे. निवडणुका जवळ आल्याने तुम्ही हे बोलत आहे. पण, तुमच्यावर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. जो मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे, त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शिवसैनिक करणार आहे.
“हे पक्षप्रमुख नाहीत तर हे ‘कट’प्रमुख आहेत”, एकनाथ शिंदेंची टीका
सावरकरांवर राहुल गांधी मुद्दाम टीका करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. जर बाळासाहेब असते तर उलटे टांगून मिर्चीची धूरी दिली असते. जे बॉम्बस्फोटाचे आरोपी आहेत ते तुमच्या प्रचारात दिसतात. तुम्ही काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदूत्व सोडले. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हवी होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले. एका खुर्चीसाठी तुम्ही सगळे घालवले. पक्षाचा प्रमुख, पक्षातील लोक संपवण्यासाठी कधी प्रयत्न करतो का? हे पक्षप्रमुख नाहीत तर हे ‘कट’प्रमुख आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही महाराष्ट्राला देत आहेत: एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही हातांनी महाराष्ट्राला देत आहेत. तरी त्यांच्यावर टीका करत आहात. पाकड्यांनी पहलगामध्ये हल्ला केला त्याला पतंप्रधानांनी इट का जवाब पत्थर से आणि गोली का जबाब गोली से दिला. मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला. पंतप्रधानांनी यामध्ये येणाऱ्यांना ठामपणे सांगितले की, आमच्यामध्ये कोणी पडायचे नाही. आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ.
तीस वर्षांपासून महापालिका ओरबडली: एकनाथ शिंदे
मगाशी रामदास कदम म्हणाले, तुमच्याकडे तीस वर्षांपासून महापालिका आहे. इतके दिवस ओरबडले. ही माया कुठे गेली? लंडनला? तुम्ही लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून खोटे परवता. पण मी सांगतो की, ही योजना कधीही बंद होणार नाही. अडीच वर्षांत येवढे काम केल्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार विजयी झाले. याचबरोबर पूरग्रस्तांना सर्व निकष बाजूला ठेऊन मदत केली जाणार आहे.
१० वर्षात मोदी सरकारने महाराष्ट्राला १० लाख कोटी रुपये दिले: एकनाथ शिंदे
तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायचा अधिकार नाही. त्यांनी महराष्ट्राला लाखो कोटींचा निधी दिला आहे. जेव्हा उस उत्पादक शेतकरी संकटात होता तेव्हा, अमित शाह यांनी १० हजार कोटी रुपये टॅक्स माफ केला. यूपीए सरकारने दहा वर्षात फक्त २ लाख कोटी दिले. तर १० वर्षात मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये दिले.
मुख्यमंत्री असताना मी साडेचारशे कोटींचा निधी दिला: एकनाथ शिंदे
लाडकी बहीण, योजना, एक रुपयात पीक योजना यासारख्या योजना, मुंबईतील टोलबंदी यासारखे निर्णय आम्ही घेतले आहे. आम्ही आतापर्यंत देण्याचे काम केले आहे. हे काम फक्त मीच करत नाही. तर माझे लाखो शिवसैनिक करत आहेत. मी मुख्यमंत्री असताना साडेचारशे कोटींचा निधी दिला. तुम्ही काय केले?
फोटो दिसतात पण, त्याच्या आत असलेली मदत दिसत नाही. त्यामध्ये पीडितांना ३५ प्रकारचे साहित्य दिले आहे. तुम्ही बिस्किटाचा पुडा तर दिला का? पाहाणी करण्यासाठी एकनाथ शिंदे जाण्यापूर्वी मदतीचे ट्रक गेले होते. आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची पथके गेले होती.
एकनाथ शिंदे वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा शिवसैनिक नाही
या दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा शिवसैनिक नाही. मी ग्राउंडवर उतरून काम करणारा शिवसैनिक आहे. आम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवले आहे.”
शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत मिळणार: एकनाथ शिंदे
शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी धीर सोडू नये. तुमचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. पण, शिवसेना आणि हे सरकार ते पुन्हा उभे केल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर त्यांना दिवाळीच्या आधी मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.
हे सरकार शेतकऱ्यांबरोबर: एकनाथ शिंदे
मराठवाड्यातील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महायुती सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यसाठी तेथिल शिवसैनिकांना या दसरा मेळाव्याला येऊ नये अशा सूचना दिल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
Sanjay Raut Dasara Melava Speech : मुंबईतील रावणाला बुडवा; दिल्लीतील रावणाला जाळा – शिवसेना नेते संजय राऊत यांचा घणाघात
“राज ठाकरे यांच्यामागे भिकेचा कटोरा घेऊन निघाले आहेत”, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे यांच्यामागे भिकेचा कटोरा घेऊन निघाले आहेत, अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचेही म्हटले आहे.
“तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची हाव होती”; उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांची टीका
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हटले की, त्यांना मुख्यमंत्रीपदाची हाव होता.
ठाकरे गट म्हणजे काँग्रेसमय शिवसेना: गुलाबराव पाटीलांची टीका
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमय झाल्याचे म्हटले आहे.
“महायुतीसाठी एकनाथ शिंदेंनी त्याग केला”, शिवसेनेच्या महिला नेत्याची प्रतिक्रिया
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या महिला नेत्या ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांनी महायुतीसाठी त्याग केल्याचे म्हटले.
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना
मुंबईमध्ये आज दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर, तर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटर मध्ये पार पडणार आहे. आणि त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईला निघालेले आहेत. कल्याणहून शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय संदेश देतील, यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
“केवळ आपली ताकद आणि…”, दसरा मेळाव्या पूर्वी शिंदे गटाच्या महिला नेत्याचे महत्त्वाचे विधान
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दल शिवसेना नेत्या शायना एनसी म्हणल्या, “दसरा मेळावा शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी यावर्षी वचन दिले आहे की, सामाजिक कर्तव्य म्हणून, आपण केवळ आपली ताकद आणि राजकीय प्रभाव दाखवू नये तर आपल्या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना मदत देखील करावी. म्हणून, शिवसैनिक स्वेच्छेने निधी उभारतील. या दसरा मेळाव्याचा प्राथमिक उद्देश आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यात मार्गदर्शन करणे आहे.”
शिवसेना एकनाथ शिंदे दसरा मेळावा २०२५ लाईव्ह. (Eknath Shinde/X)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा २०२५.