मुंबई : संपूर्ण राज्यात रविवारपासून पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारीपासून पुढील दोन आठवडे पडणारा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानुसार काही भागात सर्वाधिक पाऊस नोंदला जाण्याचा अंदाज आहे.

मुंबईसह राज्यातील इतर भागात सोमवारपासून फारसा पाऊस पडलेला नाही. काही भागात हलक्या सरी बरसल्या. मात्र, मुसळधार पाऊस पडलेला नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार रविवारपासून संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे. दरम्यान, या कालावधीत नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होणार आहेत. तसेच एक चक्रीय स्थिती बंगालच्या उपसागरात निर्माण होणार आहे. परिणामी, राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

राज्यात मागील काही दिवस फारसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. आर्द्रतेतही वाढ झालेली आहे. त्यामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईतही सारखीच परिस्थिती आहे. सध्या मुंबईकरांना उन्हाचा तडाखा आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३१.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

गेले अनेक दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे अनेक भागात तापमानात वाढ झाली आहे. तसेच काही भागात उकाडा देखील सहन करावा लागत आहे. दरम्यान, ब्रम्हपुरी येथे गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३२.२ अंश सेल्सिअस, अमरावती येथे ३२.४ अंश सेल्सिअस, तर नागपूर येथे ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या तुलनेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानाच्या पाऱ्यात काहीशी घट होती.