मुंबई : मुंबईत शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. एकीकडे लोकल उशिराने धावत होत्या, तर, दुसरीकडे गोकुळाष्टमीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. हार्बर मार्गावरील चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर, टिळक नगर रेल्वे स्थानकादरम्यान पाणी साचल्याने, लोकल सेवा मंदावली होती. संपूर्ण दिवसभरात मध्य रेल्वेवरील सुमारे ११० लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सुमारे ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. हार्बर मार्गावर पाणी साचल्याने लोकल सुमारे ४५ ते ५० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर, पश्चिम रेल्वेवरील लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावत होत्या.

हार्बर मार्गावरील टिळकनगर – कुर्लादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर पाणी साचल्याने लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर, सायंकाळपर्यंत या परिस्थितीत सुधारणा झाली. मुख्य मार्गावरील लोकल ५ ते ७ मिनिटे विलंबाने धावत होत्या. अप हार्बर मार्ग वेळेत आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल ५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. सकाळच्या वेळी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील १३ आणि हार्बर मार्गावरील १५ लोकल रद्द करण्यात आल्या, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

संपूर्ण दिवसभरात सुमारे ११० लोकल फेऱ्या रद्द झाल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. सकाळी मुसळधार पाऊस पडला तरी, लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरू होतील. फक्त काही लोकल १० मिनिटे उशिराने धावल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

मुसळधार पावसामुळे शनिवारी बेस्ट बसवरही परिणाम झाला. बेस्टच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे पहाटेपासून अनेक बसगाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या होत्या. सायंकाळपर्यंत बहुतांश मार्ग पूर्ववत करण्यात आले.

बेस्ट मार्ग वळविले

  • जोगेश्वरी पश्चिमेकडील अजित ग्लासजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे, बस मार्ग क्रमांक ४, २०२, २०३, २५६ आणि ३५९ बेहराम बाग मार्गावरून वळवण्यात आले होते.
  • बी.ए. रोडच्या परिसरात पाणी साचल्याने बेस्ट सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे ५२१, ए-२५, ए-३५१ आणि ६६ भाऊदाजी मार्गाने माटुंगा सर्कलपर्यंत वळवण्यात आले होते.
  • मालाड भुयारी मार्ग येथे पाणी साचल्याने, बेस्ट बस मार्ग ३४५ आणि ४६० मदिना मंदिरमार्गे वळवण्यात आले होते.
  • आरे कॉलनी १९ येथे पाणी साचल्याने बेस्ट बस मार्ग ४७८, ३२६, १८६, ३४१ आणि ३९८ सी क्रॉस रोड मार्गे वळवण्यात आले होते.
  • संगम नगर परिसरात पाणी भरल्याने बेस्ट मार्ग क्रमांक ११७ आणि ११० वाल्मिकी चौकातून वळवण्यात आले होते.