मुंबई : उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांना कायम गर्दी असते, तसेच आरक्षित तिकिटे मिळणे कठीण होते. त्यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत, परंतु रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण सुरू होताच एक मिनिट ३८ सेकंदांतच प्रतीक्षा यादी १,१०० पार गेली. कोकण जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीने मर्यादा पार केल्याने ‘रिग्रेट’चा संदेश दाखवण्यात येत आहे.
गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी सुरू होत असून, त्यानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १८ जुलै रोजी २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर, २५० विशेष रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त ४४ विशेष रेल्वेगाड्या आणि २ दिवा-चिपळूण मेमू अशा एकूण २९६ रेल्वेगाड्या चालवण्याचे ३० जुलै रोजी जाहीर करण्यात आले. तसेच अधिक सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा ३१ जुलै रोजी करण्यात आली असून गणेशोत्सव काळात एकूण ३०२ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने २९ जुलै रोजी गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी, तर मध्य रेल्वे प्रशासनाने ३१ जुलै रोजी या विशेष रेल्वेगाडी चालवण्याची घोषणा केली. तसेच गणपती विशेष गाडी क्रमांक ०१००३ चे तिकीट आरक्षण ५ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
● गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षण मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी सुरू झाले.
● मंगळवारी सकाळी ८ वाजता तिकीट काढण्याची वेळ सुरू झाल्यानंतर, काही सेकंदांत प्रतीक्षा यादी ५०० वरून एक हजारावर गेली.
● ८ वाजून १ मिनिट ३८ सेकंदांत प्रतीक्षा यादी १,१३७ वर पोहचली.