मुंबई – रेल्वे परिसरात मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोराला रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने अटक केली आहे. जून महिन्यात त्याने दहा दिवसात ३ मोबाईल लंपास केले होते. त्याच्यावर यापूर्वी मोबाईल चोरीचे ४ गुन्हे आहेत.

मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर उपनगरीय लोकल ट्रेनमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. ट्रेनमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी केली जात आहे.

मोबाईल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.

हार्बर मार्गावर रेल्वेतून चोरी झालेल्या एका प्रकरणाचा तपास रेल्वेच्या विशेष कृती दलामार्फत सुरू होता. सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी नदीम नवाब फरिदी उर्फ कार्टुन (२८) या सराईत मोबाईल चोराला अटक केली. तो गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये राहणारा आहे. त्याने १ ते १० जून या दहा दिवसात ३ मोबाईल फोन लंपास केले होते. हे सर्व महागडे स्मार्टफोन होते. त्याने ते सिध्दार्थ नगर मधील एका पडीक इमारतील लपवून ठेवले होते. चोरलेले तिन्ही फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. या फोनच्या मालकांची ओळख पटवून त्यांना परत केले जाणार आहेत. आरोपी नदीम याच्यावर यापूर्वी मोबाईल चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत.

ट्रेनचा वेग मंदावताच सर्वाधिक चोरी…

हार्बर मार्गावरील ट्रेन धीम्या गतीने धावतात. ट्रेन फलाटावरून सुटताना आणि फलाटावर येताना ट्रेनचा वेग मंद असतो. त्याचा फायदा आरोपी घ्यायचा आणि फोन लंपास करायचा. तो ट्रेन मध्ये बसून पाळत ठेवायचा. ट्रेन फलाटावरून सुटली की दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातून मोबाईल फोन खेचून पळ काढत होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव चव्हाण यांच्या पथकाने या आरोपीला पकडले.

दररोज सरासरी ३० मोबाईल फोनची चोरी

मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेन मध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून दररोज सरासरी ३० ते ३५ मोबाईल फोन चोरले जात आहेत. २०२४ मध्ये ११ हजार तर चालू वर्षातील ५ महिन्यात साडेतीन हजार मोबाईन फोनची चोरी झाली आहे. म्हणजेच महिन्याला साधारण ९५० आणि दिवसाला सरासरी ३० मोबाईल फोनची चोरी होत आहे.

चालू वर्षातील जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत ३ हजार ५७६ मोबाईल फोनची चोरी झाली आहे. म्हणजे या वर्षी देखील महिन्याला सातशेहून अधिक मोबाईल फोन चोरण्यात आले आहेत.