मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात ४२ हजारावर बनावट मतदार नोंदविण्यात आल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाला आवश्यक ते पुरावे हवे असतील तर, ते देण्याची आपली तयारी आहे. किंबहुना ‘मत चोरी’ सिद्ध करुन देण्यासाठी आपण सक्षम आहोत, असे थेट आव्हानच शेख यांनी आयोगाला दिले आहे.
आसीफ शेख हे २०१४ च्या निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यानंतर सलग दोनदा त्यांचा पराभव झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘इस्लाम’ हा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला आहे. या निवडणुकीत ‘एमआयएम’चे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून त्यांचा अवघ्या १६२ मतांनी पराभव झाला. हा पराभव मत चोरीमुळे झाला, असा आरोप ते सातत्याने करीत असतात.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात ‘मत चोरी’च्या विषयावरून वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शेख यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मालेगावातील ‘मत चोरी’वर पुन्हा भाष्य केले. यावेळी ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या पुढे बनावट मतदार नोंदणीचे काही उदाहरणे ठेवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीची तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले होते.
अर्थात आयोगाची ही भूमिका अनाठायी असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी असे प्रतिज्ञापत्र करून देण्यास सपशेल नकार दिला. हा धागा पकडत मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील मत चोरी संदर्भातील पुरावे देणे आणि ही चोरी सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने आपल्याला लेखी कळविले तर, असे प्रतिज्ञापत्र वगैरे करून देण्यास आपण तयार असल्याचे शेख यांनी सांगितले.
मतदार यादीत नाव नोंदवताना मतदारांचा पत्ता आवश्यक असतो. परंतु कोणताही पत्ता नसलेल्या जवळपास २८ हजार मतदारांची नावे मालेगाव मध्य मतदार संघात अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यात पत्त्याच्या रकान्यात कोरी जागा,एक शुन्य,दोन शुन्य,किंवा नुसती रेष असे प्रकार निदर्शनास आले. ११ हजारांहून अधिक मतदारांची दुबार किंवा तिबार नावे आहेत. तसेच या यादीत साडेतीन हजारावर मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट असल्याचे शेख यांनी सांगितले.
२०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यावर बनावट मतदार नोंदणी झाल्याचा प्रकार सर्वप्रथम निदर्शनास आला होता. तेव्हा तत्कालीन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे तक्रार केल्यावर सुमारे ३६ हजार नावे वगळली गेली होती. या मतदार यादीत दुबार किंवा तिबार नावे असल्याची अनेक उदाहरणे होती. काही नावे तर दहा ठिकाणी होती,असा दावा शेख यांनी केला. त्यानंतरही बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्याचा सिलसिला सुरूच राहिला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदार संघात तब्बल ४० हजार मतदारांची भर पडली,याकडे लक्ष वेधत जेमतेम सहा महिन्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार संख्या कशी वाढू शकते,असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे.
मतदार यादीत बनावट नावे समाविष्ट करणे हा मोठा भ्रष्टाचार असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराचा मार्ग पुढे जातो, असा आरोप शेख यांनी केला. ऑनलाइन मतदार नोंदणी केल्यावर संबंधित अर्जदाराने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याची बीएलओची जबाबदारी असते. संबंधित अर्जदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आला नाही किंवा त्याने दिलेली माहिती चुकीची असेल तर नियमानुसार बीएलओकडून मतदार नोंदणी नाकारली जाणे अपेक्षित असते. मात्र तसे न झाल्याने बीएलओ दोषी दिसत आहेत. यामुळे दोषी असणाऱ्या संबंधित बीएलओ यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी शेख यांनी केली.
ऑनलाइन मतदार नोंदणी करताना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका आयडीवरून कमाल सहा जणांची नोंदणी करता येते. परंतु मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात एका आयडीवरुन पाचशे ते हजारपर्यंत मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्याचेही शेख यांचे म्हणणे आहे. या पत्रकार परिषदेस आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निमंत्रक निखिल पवार, गुलाब पगारे, भरत पाटील आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने यासंदर्भात प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले.