Marathwada floods 2025 / ठाणे : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देताना पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिंदेच्या शिवसेनेवर टिका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र शब्दात टीका केली होती.

लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, असे संजय राऊत म्हटले होते. त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत “ मराठवाड्यात जाणार आहात म्हणे… किमान पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेऊन जा बरं..” असा टोला राऊत यांना लगावला आहे.

मराठवाड्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरुच आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थितीचा धोका आणखी वाढला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात दोन शाळांसह ३१५ हून अधिक घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

१५० हून अधिक जनावरांच्या मृत्यूचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे या भागातील साडेसात हजार गावांपैकी ११४० गावांमध्ये शेतात पाणी शिरल्याने दोन लाख ५५ हजार १४९ शेतकऱ्यांची दोन लाख २२ हजार १६४ हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत.

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना शिंदेच्या शिवसेनेने मदत पाठविली आहे. परंतु त्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचे चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिंदेच्या शिवसेनेवर टिका होत आहे. त्यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली होती.

राऊत काय म्हणले होते…

लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, असे संजय राऊत म्हटले होते. राज्यावर एवढे मोठे संकट असताना विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही, ही एक विचित्र आणि गंभीर परिस्थिती आहे.

संकटाच्या काळात जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणारा विरोधी पक्षनेता सरकारने ठेवला नाही. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाही आणि महाराष्ट्राच्या जनतेविरोधात केलेला कट आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत, चला आपणही मराठवाड्यात जाऊत..

“ या आधी महाराष्ट्रावर आणि देशावर किती तरी नैसर्गिक संकट येऊन गेली. त्यावेळी तुम्ही कुठे दडून बसला होतात. प्रत्येक ठिकाणी हा शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदेच मदतीचे सारं सामान घेऊन पोहोचला. तुला ही दानत, हे दातृत्व कळणारच नाही संजय राऊत…. कारण, त्यासाठी ते अंगात असावं लागतं,” अशी टिका म्हस्के यांनी केली आहे.

शिंदे मराठवाड्यात गेले, जसे याआधी गेले होते कोल्हापूर, सांगली, चिपळूण, महाड, काश्मीर आणि बऱ्याच ठिकाणी… त्यांना सवय आहे, जे आपल्याजवळ आहे त्यातून ज्याला गरज आहे त्याला देण्याची. तुम्ही पण उद्या मराठवाड्यात जाणार आहात म्हणे… किमान पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेऊन जा बरं…. फार बिकट अवस्था आहे, तिथल्या बांधवांची… एरव्ही उन्हात जळणारा मराठवाडा आज पावसाने पुरता भिजून गेलाय… बघा जमतं का, पाच रुपयाचा बिस्किटाचा पुडा न्यायला… कारण तुमची दानत तेवढीच, असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला आहे.