धुळे – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह इतर अनेक लहान पक्षही उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. महाविकास किंवा महायुती दोघांकडेही आता महाराष्ट्रात फारशी ताकद नसलेल्या परंतु, देशातील इतर राज्यांमध्ये बळ असलेले पक्ष उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रह धरण्याची शक्यता आहे. त्यापैकीच एक असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी धुळे येथे पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे.

राष्ट्रील लोकशाही आघाडी (एनडीए) बरोबर राहणार आहोत. परंतु, महायुतीतील मित्रपक्षांनी आम्हांला मानाचे स्थान दिले पाहिजे. दलित समाजाचा निधी इतरत्र वळवू नये, अन्यथा रस्त्यावरही उतरू, असा इशारा लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात कुदळे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पक्षाचे प्रदेश महासचिव डॉ. अशोक गायकवाड,राजेश छाजेड, राहुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शोभाताई चव्हाण व कल्याण गरुड आदी उपस्थित होते.

धुळे येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात विविध पक्षातील पदाधिकार्यांचा प्रवेश आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत, यावेळी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत दिशा दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रमोद कुदळे यांनी सांगितले की, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) हा राष्ट्रीय स्तरावर सक्रिय पक्ष असून बिहारमध्ये पाच खासदार तर नागालँडमध्ये दोन आमदार आणि राजस्थान, झारखंडमध्येही पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांनी केंद्रीय मंत्रीपदावर काम करताना मोफत धान्य वितरण, शेतकर्यांसाठी खत योजना, मंडल आयोगाची अंमलबजावणी यासह अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या. त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत पक्ष आज देशभर विस्तारत असल्याचे कुदळे यांनी सांगितले.

लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संघटन विस्ताराला गती मिळाली असून विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका महायुतीबरोबर लढविण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. धुळे रेल्वे स्थानकातून पुणे-कोल्हापूर आणि दक्षिण भारतासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासाठी पक्षाचे केंद्रीयमंत्री चिराग पासवान हे रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही कुदळे यांनी सांगितले.