नाशिक – विधानसभा निवडणूक प्रचारावेळी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने न पाळणे, नाशिक जिल्हा बँकेततील घोटाळ्याची चौकशी करावी, शेतकरी आत्महत्या, कृषिमालास हमीभाव, असे प्रामुख्याने कृषिविषयक प्रश्न राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने सोमवारी येथे मोर्चानंतर आयोजित सभेत सर्वच वक्त्यांनी मांडले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविषयक धोरणावर टिकास्त्र सोडण्यात आले.
शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेत शरद पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांसह इतरांनी मार्गदर्शन केले.
खासदार सुळे यांनी, निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज माफीचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते, याकडे लक्ष वेधले. आश्वासनाची अद्याप महायुतीने पूर्तता केलेली नाही. सरसकट कर्जमाफीसाठी मोर्चा झाल्यानंतर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, सरसकटपणे कर्जमाफीची मागणी करा. यासाठी महिनाभराचा वेळ द्या. मात्र त्यानंतरही कर्जमाफीची घोषणा न झाल्यास राज्य सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सध्या संकटात आहे. त्याला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. पुढील काळात लाडक्या बहिणींसाठीही आंदोलन करण्यात येणार आहे. २५ लाख महिलांची नावे लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आली. त्याचा जाब विचारला जाईल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरासह नाशिक जिल्हा बँकेतील घोटाळ्याची चौकशी करावी, यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.
माजी मंत्री राजेश टोपे यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. सरसकट पंचनामे करतांना चेहरे बघून पंचनामे करू नका, असे आवाहन त्यांनी केले. आ. रोहित पवार यांनी, कर्जमाफी, महिलांचे प्रश्न याविषयी ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
सरकारला घमंड आला आहे. घमेंड शेतकऱ्यांनी उतरवत त्यांना जमिनीवर आणायचे आहे. आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी देण्याचे सरकारला वाटत असेल, परंतु, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार असतील तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी केला. हे देवाभाऊ नाहीत तर मेवाभाऊ असून त्यांना मलिदा खायचा आहे. हे सरकार लबाड, पाकिटमार असून जीएसटीच्या माध्यमातून लूट करण्यात येत असल्याची टीका केली.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी, शेतकऱ्यांनी ठरवले आणि एकत्र आले, ही शेतकऱ्यांची लढाई आ, असे सांगितले. सातबारा कोरा करण्यासाठी आजचा मोर्चा आहे. कर्जमाफी योग्य वेळी करू, असे सांगतात. आजही महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. शेतकऱ्यांकडे बघायला सरकारला वेळ नाही. कांद्याने सरकार पाडले आहे. महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री स्थिर नाही . शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका, असा इशारा शिंदे यांनी दिला. साहेब खडे तो सरकार से बडे, असे सांगत शेतकरी तुमच्या बरोबर आहे, असे ते म्हणाले.
माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, शेतकऱ्यांना शरद पवार यांच्याकडून अपेक्षा असल्याचे नमूद केले. सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक संकटात आहे. मागील वर्षाची नुकसान भरपाई दिली नाही. विदर्भात शेतकरीआत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. आदिवासी बांधवांचे पैसे दिलेले नाही. सरकारला कर्जमाफी करायची नाही. तिघांचे सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. सातबारा कोरा करून घेणे आपल्यासाठी महत्वाचे असून यासाठी मोर्चा काढल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी (शरद पवार) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोपात झालेल्या सभेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.