मुंबईः राज्यभरात जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी शुक्रवारी दिली.
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जूनमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. रायगड जिल्ह्यातील ९८० बाधित शेतकऱ्यांच्या ५५.६५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५६० शेतकऱ्यांच्या ७१.५४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ९६ हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३५ शेतकऱ्यांच्या ५०.६४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ६३ हजार रुपये असे १ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या १७७.८३ हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून ३७ लाख ४० हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून-ऑगस्ट दरम्यान शेती पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाखांची मदत दिली जाणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ७ हजार ४५० शेतकऱ्यांच्या ४५५९.६२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३९२.८३ लाख रुपये. वर्धा जिल्ह्यात ८२१ शेतकऱ्यांच्या ४८५.८० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४१.५४ लाख, तर जुलै मधील नुकसानीच्या मदतीसाठी २ हजार ८२७ शेतकऱ्यांच्या २२२४.९१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी मदत दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १३ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या ८६२१.०६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी, हिंगोली जिल्ह्यात ३९६ शेतकऱ्यांच्या २१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी, सोलापूर जिल्ह्यात ५९ हजार ११० शेतकऱ्यांच्या ५६ हजार ९६१.७३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत दिली जाणार आहे.