नागपूर : नागपूर- गोवा या शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या विरोध आहे. नागपूर लगतच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून महामार्गाची सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी वेगाने भूसंपादन करण्याचे आदेश आहेत. यासोबतच भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे, ही कामे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासह इतर प्रकल्पांसाठी भूसंपादन कार्याला गती देण्याचे व यासदंर्भात नियमीत अहवाल सादर करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन व भूमी अभिलेख विभागाला दिले.

बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात रस्ते विकास महाम्ंडळाच्या विभागातील प्रकल्पाच्या भूसंपादन कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदाल, सहआयुक्त (पुनर्वसन) प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी इंदिरा चौधरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रशासक (नवनगरे) निशीकांत सुके, भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

यावेळी नागपूर-गोंदिया शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर, पवनार ते पत्रादेवी (शक्तीपीठ) शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन व संयुक्त मोजणीच्या वर्तमान स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. या प्रकल्पांसाठी भूसंपादनाच्या कार्याला गती देवून मोजणी पूर्ण करत संयुक्त मोजणी अहवाल तत्काळ भूसंपादन अधिकाऱ्यांकडे सादर करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.

उपअधिक्षक भूमी अभिलेख यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने तत्काळ मोजणी करून अहवाल संबंधित भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना सादर करावा, असे सांगण्यात आले.त्याच प्रमाणे विहित कालावधीत मोजणी व संयुक्त मोजणी अहवाल सादर करण्याबाबत एक वेळापत्रक सर्व संबंधितांना निश्चित करून द्यावे व त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देशही श्रीमती बिदरी यांनी बैठकीत दिले .