जळगाव – शहरात शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी महायुतीच्या सरकारची प्रतिकात्मक तिरडी जाळण्याचा प्रयत्न झाला असता पोलिसांनी जाळपोळ करण्यास मनाई केली. प्रत्यक्षात त्यानंतरही आंदोलक मागे हटले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ठाकरे गटाचे उपनेते तथा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या जन आक्रोश मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाली. मोर्चात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढली. शेतकरी विरोधी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक तिरडी जाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता भर रस्त्यात जाळपोळ केली.

तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना रमी गेम खेळत असतानाचे व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली. प्रत्यक्षात, महायुतीने त्यांचा राजीनामा घेतला नाही. फक्त खाते बदल करून वेळ मारून नेली. त्याबद्दल सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपमहागर प्रमुख प्रशांत सुरळकर या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यात पत्त्यांचा डाव मांडला. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे.

आरोप झालेल्या मंत्र्यांना वॉशिंग मशिनमध्ये टाकतात. यापूर्वी मंत्र्यांना आधी तुरूंगात जाण्याची भीती असे. पण तशी भीती आता मंत्र्यांना राहिलेली नाही. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले मंत्री भाजपमध्ये गेल्यानंतर पवित्र होतात, असा आरोप संजय सावंत यांनी केला. भविष्यात सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रकार थांबले नाही तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील सावंत यांनी दिला.

ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील, उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपमहागरप्रमुख नीता सांगोळे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जहीर पठाण, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, कुसुंबाचे उपसरपंच प्रमोद घुगे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, फिरोज पठाण, शोएब खाटीक, किरण भावसार, निलेश ठाकरे, बाळा कणखरे, विजय बांदल, विजय राठोड, जैनुद्दीन शेख, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, पप्पू तायडे, राकेश माळी, बिरजू शिरसाठ, शरद पाटील आदी उपस्थित होते.