नाशिक – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला नाशिक जिल्ह्यात यश मिळवून देणाऱ्या दिंडोरी मतदार संघापासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तीन दिवसीय नाशिक दौऱ्याला प्रारंभ होत आहे. दिंडोरी तालुक्यातील आंबे येथे १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शरद पवार यांचा पहिला कार्यक्रम होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर शरद पवार पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या लोकसभा मतदारसंघापासून राजकीय मैदानात उतरणार आहेत.

संपूर्ण देशाचे राजकारण हलवून टाकण्याची ताकद असलेला कांदा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपासून कांद्याला कमी दर मिळत आहेत. कांद्याविषयी केंद्र सरकारचे असलेले धोरण त्यास कारणीभूत असल्याची टीका कांदा उत्पादकांकडून केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समितीत शनिवारी कांद्याचे दर ८५१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले. कांदा उत्पादकांच्या समस्येकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मंत्र्यांना फोन करण्याचे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या मते, सध्या १० ते १५ रुपये प्रति किलोने कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यातच सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात आणल्यामुळे स्थानिक दरांमध्ये आणखी घट झाली आहे. ग्राहकांना जरी दिलासा मिळत असला तरी, शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकार बिहारमधील निवडणूक आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी कांद्याचे दर पाडत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

शरद पवार यांच्यासाठी कांद्याचा विषय हा कायमच जिव्हाळ्याचा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी कांद्याविषयी त्यांनी केलेल्या प्रचारामुळेच भास्कर भगरे यांच्यासारख्या सामान्य शिक्षकाने केंद्रीय राज्यमंत्र्यांना पराभूत करण्याच किमया केली होती. असे असताना आणि सध्या कांदा विषय प्रचंड चर्चेत असताना शरद पवार यांनी नाशिक जिल्हा दौऱ्यासाठी आंबे या खेडेगावाची निवड केल्याने आश्चर्य वाटणे साहजिक आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

आंबे हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे गाव. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे दादासाहेब यांना स्वत:चा उजवा हात मानत. बाबासाहेबांबरोबर अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या दादासाहेबांचे कार्य या गावात उभारण्यात आलेल्या कर्मवीरांच्या स्मारकाचे उदघाटन १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. शरद पवार हे कायमच पुरोगामी विचारांची कास धरत आले आहेत. त्यामुळे कर्मवीरांच्या स्मारकाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणे यात नवल ते काय.