पुणे : ‘राज्याच्या गृहमंत्र्यांना वाटत असेल, की पुण्यात दादागिरी होत असल्याने गुंतवणूक येत नाही, तर मला विनम्रपणे मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे, की त्यावर तुम्ही काय कृती केलीत? तुम्हाला माहीत आहे दादागिरी सुरू आहे, तर मोडून काढा; आम्ही तुम्हाला साथ देऊ,’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केले. तर, ‘मी तर दादागिरी मोडून काढणारच आहे. त्यासाठी कुणी मदत करणार असेल, तर त्याचे स्वागत आहे,’ अशी प्रतिक्रिया यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे,’ असे विधान मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पुण्यात ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’च्या प्रारंभ कार्यक्रमात केले होते. त्यावर शनिवारी राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.

‘तुम्हाला माहीत आहे दादागिरी होत असल्याने गुंतवणूक येत नाही, तर त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी सांगावे, की कुणाची दादागिरी होते आहे,’ असे सुळे म्हणाल्या. ‘गुंतवणूक येत नाही, हे कबूल केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पण, याला जबाबदार कोण, याचे उत्तरही मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल,’ असा चिमटाही त्यांनी काढला.

‘दादागिरी कमी करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांना एकमत करावे लागेल, कारण खूप मोठी राजकीय दादागिरी पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे,’ असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘विविध पक्षांची नावे घेऊन लोक दादागिरी करतात. मी तर ती मोडून काढणारच आहे, पण त्यात जो जो मदत करील, त्याचे स्वागतच आहे.’

‘पुण्यात ‘एमआयडीसी’मध्ये दादागिरी चालू आहे,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार म्हणाले, ‘ही दादागिरी अजितदादांच्या पक्षाची, भाजपची, की शिंदे यांच्या शिवसेनेची आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. दादागिरी होते आहे, हे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कबूल करत असाल, तर कोण दादागिरी करते, याचे नाव तुम्ही जाहीर करावे, असे आव्हान आम्ही सामान्य नागरिक म्हणून देतो.’

दरम्यान, माणगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात कुठेही आम्ही दादागिरी खपवून घेत नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरांचे पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, की कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे कुणीही उद्योगांना त्रास देत असतील, तेथे काही अडचणी निर्माण करत असतील, तर त्यांच्यावर खटले दाखल करा. तीन-चार वेळा खटले दाखल करूनही ऐकले नाही, तर त्यांच्यावर ‘मकोका’ लावा.’

‘फक्त पुण्यातच नाही, तर महाराष्ट्रात कुठेही येणाऱ्या उद्योगपतींना गुंतवणूक केल्यानंतर जी काही मदत झाली पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजेत, ते देण्याचे काम आणि कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्याचे काम राज्य सरकारचे आहे आणि ते आम्ही पार पाडतो,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.