Maharashtra Politics News Updates, 04 August 2025 : हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला तेव्हा महाराष्ट्र अस्तित्वातही नव्हता, अशा शब्दांत अविमुक्तेश्वरानंद यांनी मराठी-हिंदीवरून चालू असलेल्या वादावर टिप्पणी केली आहे. यावरून अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर टीका होऊ लागली आहे. भाषेवरून चालू असेला वाद, घडामोडी व राजकीय वक्तव्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला, मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज (४ ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यावर ते दिल्लीत गांधी कुटुंबाची भेट घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वेगवेगळ्या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोठी घडामोड घडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यासंबंधीच्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा तापू लागला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’ची हाक दिली आहे. २९ ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत धडकतील.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

19:07 (IST) 4 Aug 2025

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी खासदार निशिकांत दुबेंना दिला सल्ला; म्हणाले, “अशा प्रकारची वक्तव्य…”

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत निशिकांत दुबे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. …अधिक वाचा
17:31 (IST) 4 Aug 2025

“शिवसेनेचाही बाप मीच”, भाजपा आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

Devendra Fadnavis on Parinay Fuke : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही प्रसारमाध्यमं अलीकडच्या काळात नेत्यांची वक्तव्ये कापून-कापून दाखवता. ती वक्तव्ये दिवसभर टीव्हीवर दाखवून एकेक दिवस काढता.” …सविस्तर वाचा
17:22 (IST) 4 Aug 2025

बिबट्याच्या हल्लात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू; जळगावमधील खळबळजनक घटना

बिबट्याच्या हल्ल्यात यापूर्वी अनेकांचा बळी गेला असताना पुन्हा तशी घटना उजेडात असल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. …सविस्तर वाचा
17:01 (IST) 4 Aug 2025

श्रावणी सोमवारमुळे आर्थिक उलाढालीस चालना

पूजेचे सामान, प्रसाद, उपवासाचे खाद्यपदार्थ यांची दुकाने तसेच अभिषेक सामान असणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीने लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. …सविस्तर वाचा
16:20 (IST) 4 Aug 2025

ग्रामीण जनजीवनातील परिवर्तनासाठी सातारा जिल्हा बँकेचे सहकार्य – नितीन पाटील

हरिपूर (ता. खंडाळा) येथील नवीन विकास सेवा सोसायटीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. …सविस्तर बातमी
16:06 (IST) 4 Aug 2025

साताऱ्यातील पोलीस आधिकाऱ्यांच्या बदल्या

यामध्ये कराड, फलटण, दहिवडी, सातारा ग्रामीण येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. …सविस्तर वाचा
15:29 (IST) 4 Aug 2025

निवळी येथे गॅस टँकर उलटला; चालक गंभीर जखमी

कोल्हापूरकडे गॅस घेऊन जाणारा टँकर (टी एन ८८ एल ९६६१) निवळी फाट्याजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. …सविस्तर बातमी
14:28 (IST) 4 Aug 2025
“सैराट सोडलेल्या वळूला आवरा अन्यथा…”, भाजपा आमदार फुकेंविरोधात शिंदे गट आक्रमक; महायुतीत राडा

भंडारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या भंडारा जिल्हा दुग्ध संघ व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भाजपात ठिणगी उडाल्याचे चित्र दिसत आहे. एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत असताना १ ऑगस्ट रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान उडालेल्या शाब्दिक चकमकीवरून दोन्ही पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. परिणय फुके यांच्या शिवसेनेचा बाप मीच असल्याच्या वक्तव्यावरून शिवसेना (शिंदे) संतापली आहे. अशी अहंकारी भाषा वापरणाऱ्या आमदारांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशा शब्दांत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. तसेच आमदार परिणय फुके यांनी १२ तासांत माफी मागावी, अशी मागणी केली.

सैराट सोडलेल्या वळूला भाजपा पक्षश्रेष्ठींनी आवर घालावी अन्यथा शिवसेना (शिंदे गट) प्रतिउत्तर देणार असल्याचा सज्जड दम शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी भंडाऱ्यातील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिला.

14:26 (IST) 4 Aug 2025

अजित पवार, एकनाथ शिंदे गटावर विश्वास कसा ठेवणार ? …भाजपच्या या माजी मंत्र्याची नाराजी

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर डाॅ. विजयकुमार गावित यांचा रोष असला तरी अजित पवार गटासंदर्भातही त्यांनी सुचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. …सविस्तर बातमी
14:17 (IST) 4 Aug 2025

“राज ठाकरेंचे जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याचे आदेश”, मनसेच्या मेळाव्याबाबत नांदगावकरांचं वक्तव्य; ठाकरे गटाशी युतीबाबत म्हणाले…

Bala Nandgaonkar on MNS Party Meeting : बाळा नांदगावकर म्हणाले, “राज ठाकरे यांनी आम्हाला सूचना केली आहे की जुन्या कार्यकर्त्यांना तुमच्याबरोबर घ्या.” …सविस्तर वाचा
14:15 (IST) 4 Aug 2025

व्याजमाफी नाही तर दमडाही नाही…तीन मंत्र्यांना शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावले

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने थेट थकबाकीदार सभासदांकडे थकबाकी वसुलीसाठी जाहीर केलेल्या सामोपचार कर्जफेड योजनेस विरोध असल्याचे या पदाधिकाऱ्यंनी सांगितले. …सविस्तर बातमी
13:59 (IST) 4 Aug 2025

जायकवाडी धरण ५० वर्षात केवळ १४ वेळा… राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले ?

संततधारेमुळे नाशिक आणि अहिल्यानगरमधील धरणांमधून प्रवाहीत झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी विक्रमी वेळेत तुडूंब भरण्याच्या स्थितीत पोहोचले. …अधिक वाचा
13:02 (IST) 4 Aug 2025

मुंबईती मदनपुरा परिसरात इमारत कोसळली

मुंबईच्या मदनपुरा परिसरात एक जीर्ण इमारत कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच यात कोणीही जखमी झालेलं नाही. मदनपुरामधील हुसैनी बस्तीमधील नूर मंझील ही दुमजली इमारत धोकादायक अवस्थेत होती. त्यामुळे म्हाडाने नोटीस बजावून ही इमारत रिकामी केली होती. या इमारतीचं पाडकाम सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान, आज (४ ऑगस्ट) दुपारी ही इमारत कोसळली. प्रशासनाने आधीच ही इमारत रिकामी केली होती. त्यामुळे सदर दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

11:33 (IST) 4 Aug 2025

रोहित पवारांचा पोलिसांना पुन्हा एकदा ‘आवाज खाली’ करण्याचा इशारा, कोथरूड प्रकरणावरून संताप

रोहित पवार म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्याशीही चर्चा केली.” यावेळी प्रशांत जगताप, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले, “सत्तेची मस्ती चढल्याने निर्ढावलेल्या राज्यकर्त्यांच्या दबावात येऊन काम करणाऱ्या सरकारी यंत्रणाही निर्ढावतात. अशा यंत्रणांचा सर्वाधिक फटका हा सर्वसामन्यांना आणि दीन-दुबळ्यांना बसतो. तसाच काहीसा प्रकार तीन युवतींच्या बाबतीत घडला. त्यांना चक्क कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.”

“याबाबत गुन्हा दाखल व्हावा म्हणून दोन दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत होते. काल रात्री मी स्वतः तसेच अंजलीताई आंबेडकर, प्रशांतदादा जगताप, सुजात आंबेडकर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, वंचित, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रात्री ३ वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसलो, पण यंत्रणा मात्र तक्रार घ्यायला तयार नव्हत्या. पोलिसांनी तक्रार घेतली नसली तरी जनमताच्या दबावापुढे झुकत पोलिसांकडून तसं लेखी मात्र आम्ही घेतलं. पोलीस यंत्रणा सर्वसामान्यांना अशाच प्रकारे त्रास देणार असेल तर आम्हीही ‘आवाज खाली’ असाच प्रतिसाद देऊ. झोपलेले गृहमंत्री जागे होतील, ही अपेक्षा!”

11:02 (IST) 4 Aug 2025

निळवंडे धरणाचे तीनवेळा भूमीपूजन करणारा महाराष्ट्रातील ‘तो’ नेता कोण ?

विखे यांनी उल्हास वैतरणा नदी जोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद केले. …अधिक वाचा
10:24 (IST) 4 Aug 2025

‘एमपीएससी’च्या जाहिरातीतून ‘पीएसआय’ पद गायब! राज्यात दोन हजार जागा रिक्त असतानाही…

‘एमपीएससी’ मार्फत दरवर्षी पीएसआय, राज्य कर निरीक्षक (एसटीआय), आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. …वाचा सविस्तर
10:18 (IST) 4 Aug 2025

मोदी-शाहांचा राष्ट्रपती भेटीवरून ठाकरे गटाचं सूचक वक्तव्य

संसदेचं पावसाळी अधिवेशन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३ ऑगस्ट) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांनी गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “सप्टेंबर महिन्यात आपल्याला एखादी मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकते. मोदी यांनी राष्ट्रपतींना भेटणं हा कामाचा भाग असतो. मात्र, ते अजूनही राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचं आहे. कारण ते राष्ट्रपतींना भेटायला बोलवत नाहीत ही मोठी गोष्ट आहे. यातच खरी बातमी आहे. मोदी यांची देशातील कामाची पद्धत पाहता काहीही होऊ शकतं. काय होतंय ते आपण बघुया. “