मुंबई : राज्यात शनिवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी भागात रविवारी मुसळधार पावसाचा, तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे.

गेले काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून राज्यातील अनेक भागात पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे मागील काही दिवस उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत होता. मुंबईतचही अशीच परिस्थिती होती. दरम्यान, उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली परिसरात शनिवारी सकाळी जोरदार पाऊस पडला. याचबरोबर शहरातील इतर काही भागातही पाऊस कोसळला.

दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईतही शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातील काही भाग वगळता इतर भागातही तापामानात घट झाली होती.

ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात सतत चढ – उतार होत आहे. काही वेळा तापमानात घट, तर काही वेळा वाढ होत आहे. दरम्यान, ब्रह्मपुरी येथे शनिवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशाने अधिक नोंदले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर येथे ३२.६ अंश सेल्सिअस, अमरावती ३२.८ अंश सेल्सिअस, तर गोंदिया येथे ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी.

अतिमुसळधार पाऊस

रायगड.

मेघगर्जनेसह पाऊस

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव.

विजांसह मुसळधार पाऊस

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.