कल्याण – सायंकाळच्या वेळेत मध्य रेल्वे स्थानकावरील प्रत्येक स्थानक प्रवाशांनी खच्चून भरलेले असते. प्रत्येक प्रवाशाची घरी जाण्याची, कार्यालयाने दिलेल्या कामाच्या ठिकाणी जाण्याची धडपड असते. अशा वेळी संध्याकाळच्या वेळेत मुंबईकडून प्रवाशांनी भरून येणाऱ्या लोकलमध्ये प्रत्येक प्रवाशाला चढताच येते असे नाही.
त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संध्याकाळच्या वेळेत धावणाऱ्या विशेष लोकलमध्ये सामान्य प्रवाशांसाठी काही डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पदाधिकाऱ्यांनी रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शेखर मीना यांच्याकडे केली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यां संदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, सचिव जितेंद्र विशे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शेखर मीना यांची मुंबई कार्यालयात भेट घेतली. यावेळच्या बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
संध्याकाळी चारच्या वेळेत मुंबईतून कल्याण दिशेने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सोडण्यात येते. ही विशेष लोकल बहुतांशी रिकामी असते. या विशेष लोकलचे काही डबे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव आणि उर्वरित डबे सामान्य प्रवाशांसाठी राखीव ठेवले तर प्रवाशांना दिलासा मिळेल, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याविषयी चर्चा सुरू आहे, असे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
सकाळच्या वेळेत मुंब्रा, दिवा, कोपर भागातून अनेक प्रवासी उलट मार्गाने कल्याण, डोंबिवली लोकलने प्रवास करतात. तेथून पुन्हा मुंबईचा परतीचा प्रवास सुरू करतात. स्थानिक कल्याण, डोंबिवलीच्या प्रवाशांना हक्काची लोकल असुनही बसण्यास जागा मिळत नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी दिवा, मुंब्रा, कोपर रेल्वे स्थानकातील सुरक्षा बळ जवान, लोहमार्ग पोलीस यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे सांगण्यात आले.
सकाळ वेळेत बदलापूर, कल्याण, टिटवाळा दिशेने वेळेत धावणाऱ्या सामान्य लोकल बाजुला काढून त्यांच्या पाठीमागच्या वेळेतील वातानुकूलित लोकल पुढे काढण्याचे प्रकार रेल्वेकडून सुरू आहेत. हा दुजाभाव रेल्वे प्रशासनाने करू नये, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. नियंत्रक अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईकडून पुणे दिशेने धावणाऱ्या अनेक एक्सप्रेसचा कर्जत थांंबा रद्द केला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानकात येऊन प्रवास करावा लागतो. हे रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले.
कल्याण-कसारा, कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली. ही कामे यावर्षात पूर्ण होतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय रेल्वे प्रवाशांच्या इतर मागण्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
रेल्वे प्रवाशांच्या विविध विषयांवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या सोबत उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेची एक बैठक घेण्यात आली. प्रवाशांच्या विविध समस्या या बैठकीत मांडून त्यांचे निराकरण करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.