Maharashtra Politics Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चर्चेत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरून राज्यभरात आवाज उठवला आहे. भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत विरोधक करत आहेत. तसेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, यावरूनच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत असून यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी असल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांनी आपल उपोषण मागे घेतलं आहे. तसेच ठाकरे गटाचे काही नेते आणि कॉग्रेसचे काही नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Update Today : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
पिंपरी : वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये पाडणार
पिंपरी : शहरातील नादुरुस्त, वापरात नसलेल्या, मोडकळीस आलेल्या सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार वापरात नसलेली शौचालये पाडण्यात येणार आहेत. त्या जागी नवीन शौचालयाची उभारणी किंवा इतर कारणांसाठी जागेचा वापर केला जाणार आहे.
पिंपरी : महापालिकेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन; तक्रार महिन्याभरात निकाली…
पिंपरी : नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडवण्यासाठी, प्रशासन आणि नागरिकांमधील संवादवाढीसाठी आता महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रसृत केला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा हा लोकशाही दिन अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राबवला जाणार आहे
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
सांगली : ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख शुद्ध ऊस रोपे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती राजारामबापू कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी इस्लामपूर येथे दिली
मुलाचा खूनप्रकरणी, आईसह प्रियकरास जन्मठेप
सातारा : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याच्या खुनास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलाची आई आणि तिचा प्रियकर यांना वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एम मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?
पुणे : राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सदस्य पदावरून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात शिवतारे हे शिवसेना (शिंदे) पक्षाचे एकमेव आमदार असतानाही त्यांना संधी न दिल्याने महायुतीत नाराजी पसरली आहे.
अपघातात जीव गमावूनही तिनं दिलं सहा जणांना जीवदान…
पुणे : रस्ते अपघातात जीव गमाविलेल्या मुलीमुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे. नारायणगाव येथे झालेल्या अपघातात ही मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. तिचे अवयव सहा जणांना प्रत्यारोपित करण्यात आले आहेत.
सांगलीत मृत मगरीच्या अंत्यसंस्कारावरून वाद, मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची मागणी
सांगली : नदीत मृत झालेल्या मगरीच्या पार्थिवावर वन विभागाने बेकायदा अंत्यसंस्कार केले असून मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा रविवारी ग्रामस्थांच्या मदतीने दहन करण्यात येईल, असे पत्र ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. वारणा नदीपात्रात दि. २७ जानेवारी रोजी पूर्ण वाढ झालेली मगर मृतावस्थेत वाहत आली होती.
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन, पृथ्वीराज पाटील
सांगली : महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गरिबी हटाव व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले. गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत. लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय, असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
पुणे : वर्षात अडीच हजार कोटींची कामे, जिल्ह्यासाठी तेराशे कोटींसह ७५३ कोटींच्या अतिरिक्त निधीला ‘डीपीसी’मध्ये मंजुरी
जिल्ह्यासाठी १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा आणि अतिरिक्त ७०० कोटीं रुपायंची मागणी या बैठकीत करण्यात आली.
कोल्हापुरात दूध उत्पादकांचा दरवाढीसाठी गायींसह मोर्चा
कोल्हापूर : गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधात प्रति लिटर ४ रुपये आणि ३ रुपये अशी दोन वेळा कपात केली आहे.
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
पुणे : राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आतापर्यंत दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत एका बैठकीत पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
आर्थिक व्यवहारातून आवाडेंचा सूतगिरणी चालकांसोबत वाद
कोल्हापूर : आर्थिक देवघेवीच्या व्यवहारातून तामगाव ( ता. करवीर) येथील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये माजी आमदार प्रकाश आवाडे समर्थकांनी गिरणीत घुसण्याचा प्रयत्न केला. मिलमधील कर्मचारी व समर्थक यांच्यात वाद झाला. अभिषेक स्पिनिंग मिलमधील येणे रकमेवरून प्रकाश आवाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जत्रंला येऊ द्या …पण विमानाने; भादवणकरांचे असेही उड्डाण !
कोल्हापूर : ‘अरे तुमच्यात सामील होऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की रं ‘… असा लडिवाळ जत्रेला जाण्याचा हट्ट धरणारे गाणे अनेकांच्या मनात रुंजी घालत असेल. जत्रेला जाण्याची मनीषा वेगळ्या प्रकारे घडवून भादवणकरांनी गुरुवारी वेगळेच उड्डाण घेतले. मुंबईतील हे चाकरमानी गावच्या जत्रेच्या ओढीने चक्क मुंबईहून कोल्हापूरला विमानाने आले आहे. त्यांच्या या प्रवासाची कौतुकमिश्रित चर्चा होत आहे.
पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित
पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्राचा विचार करून हा आराखडा करण्यात आला आहे.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फासवर नाही तर हाल हाल करून…”,छगन भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण चर्चेत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणावरून राज्यभरात आवाज उठवला आहे. भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत विरोधक करत आहेत. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं ते अतिशय अमानुष आहे. राक्षस देखील अशी कृती करणार नाही. अशास प्रकारे सोमनाथ सुर्यवंशीच्या बाबतीत घडलं. या विरोधात सर्वच घटकांनी लढायला पाहिजे. मात्र, तो या समाजाचा आहे आणि हा दुसऱ्या समाजाचा आहे हे मला काही पटत नाही. आरोपींना फासवर नाही तर हाल हाल करून मारलं पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
तेराव्या विधीसाठी जाताना बार्शीजवळ अपघातात वृद्धाचा मृत्यू
सोलापूर : आपल्या नातलगाच्या निधनानंतर तेराव्या दिवसांचा विधी उरकण्यासाठी स्मशानभूमीकडे पायी चालत निघालेल्या एका वृद्धाला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने ठोकरले. यात त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील मानेगाव येथे ही दुर्घटना घडली.
नारायण सुबराव माळी (वय ६५, रा. उपळे दुमाला, ता. बार्शी) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. मृत नारायण माळी यांचे मानेगावात राहणारे साडू चंद्रकांत डाके यांचे निधन झाले होते. त्यांच्या तेराव्याचा विधी उरकण्यासाठी नारायण माळी हे मालेगावात आले होते. सकाळी अन्य काही नातेवाईकांबरोबर नारायण माळी हे पायी चालत स्मशानभूमीकडे निघाले असताना सोलापूरहून बार्शीच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या एका मोटारीने त्यांना पाठीमागून जोरात ठोकरले. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मोटारचालकाविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे.
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिन हा ‘गुड फिलिंग्स’ हे गाणे सादर करत असताना मराठमोळे शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.
‘ब्लॅक वॉरंट’मधील ‘सनी त्यागी’ ठरतोय लक्षवेधी; मराठमोळा दिग्दर्शक प्रताप फड यांच्या अभिनयाचे कौतुक
१९८० च्या दशकात सुनील गुप्ता हे तिहार तुरुंगाचे तुरुंगाधिकारी होते. त्यांचे अनुभव त्यांनी आणि पत्रकार सुनेत्रा चौधरी यांनी ‘ब्लॅक वॉरंट : कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणले.
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
पुणे : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) आणि आरटीई प्रवेश प्रक्रिया यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा एकत्रित करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत.
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
‘सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळत असल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे.
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
यंदाच्या थंडीच्या हंगामातील काही कालावधीपुरती राहिलेली कडाक्याची थंडी वगळता सातत्याने हवामान चढउतार होत आहेत.
रायगडच्या कलिंगडांना दुबईत मागणी
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील रोहन पाटील या तरुण शेतकऱ्यांने पिकवलेली कलिंगडे दुबईला निघाली आहेत. पहिल्या टप्प्यात ४० टन कलिंगड दुबईत पाठवली जाणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना अटक
गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत पोलीस उपायुक्तांचे विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी कल्याण, डोंबिवलीतील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना विविध भागातून अटक केली.
महंत नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; मनोज जरांगे म्हणाले, “महंत अशा प्रकारे कोणालाही…”
मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबरोबर काय चर्चा झाली? याविषयीची माहिती डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. “भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे, असंही महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं. त्यांच्या या भूमिकेबाबत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाले, “महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री हे खूनाच्या घटनेबाबत, खंडणीच्या घटनेबाबत बोलतील असं वाटत नाही. आता धनंजय मुंडे यांना कुठे हात पसरावेत हे कळायला तयार नाही. कोणताही समाज असो मस्साजोग सारख्या घटनेला पाठिशी घालत नाही आणि महंत देखील अशा प्रकारे कोणालाही पाठिशी घालत नाहीत. तसेच या संपूर्ण घटनेचा संप्रदायावर काही परिणाम होण्याचं कारण नाही. त्यामुळे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री हे असं बोलतील असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
नवीन पनवेल येतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीझन क्रिकेट मैदान आणि महापालिकेने विकसित केलेल्या लोकाभिमुख ॲप सेवेसह अनेक विकासकामांचे लोकार्पण सोहळा पुढील आठवड्यात पनवेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे.
ठाणे जिल्हा निधीसाठी तहानलेलाच
ठाणे : पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पद लाभलेल्या ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी गेल्यावर्षी ११६७ कोटींपैकी ४६० कोटी रुपये इतकाच निधी प्राप्त झाल्याची बाब समोर आली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील विकास कामांसाठी विविध विभागांकडून २८२० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असतानाही, केवळ १०५० कोटींचा निधीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी…”
काँग्रेस पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे काही वेगळी वाटचाल असणार का? असा प्रश्न रवींद्र धंगेकर यांना विचारला असता ते म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात आहे, काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे. काँग्रेस पक्ष जे सांगेल ते मी काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहणार आहे. शिवसेनेत (शिंदे गट) जाण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही. वैयक्तिक कामानिमित्त भेटलो, कामाच्या संदर्भानेच चर्चा झाली, बाकी काही नाही. मी काँग्रेस पक्षातच आहे आणि वैयक्तिक कामाला कोणी कोणाला भेटू नये असं कोणी म्हटलेलं नाही. सर्वजण एकमेकांना भेटतात मग मी भेटलं त्यात गैर काय?”, असं रवींद्र धंगेकर यांनी ‘लोकसत्ताशी’ बोलताना म्हटलं.
महंत भगवान शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गडावर पत्रकार परिषद घेऊन त्यांची ही भूमिका स्पष्ट केली. त्यावर अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “भगवान गड आपल्यासर्वांसाठी पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं आणि अशी पाठराखण केली जावी याचं वाईट वाटलं. आपण कोणीही मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. पण नामदेव शास्त्रींना कदाचित धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी असं विधान केलं. अतिशय आदरपूर्वक मला म्हणावंसं वाटतंय, तुम्हाला एवढी माहिती नसेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचते. बोलणारे लोक कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीत. जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली जात आहे. मी जे धनंजय मुंडेंविरोधात बोललेय, जे तथ्य आहे तेच सांगितलं आहे. अतिशय आदरपूर्वक नामदेव शास्त्रींना सांगावं वाटतं की असं व्हायला नको होतं”, अशी खंतही अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कधी सुटणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरु आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. मंत्री भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजपा आग्रही आहे. दरम्यान, यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. आता यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असं सांगितलं आहे.
'भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी', नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका (फोटो-संग्रहित छायाचित्र)